मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासात भाजपाचे (BJP) नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट टोला लगावला की, मंत्री दादा कोंडकेंसारखे उत्तर देत आहेत का? त्यांच्या या विधानामुळे विधानभवनात चर्चेला उधाण आले.
मुनगंटीवार यांनी नाला रुंदीकरण आणि त्यासंदर्भातील नियोजनाचा मुद्दा उपस्थित करत जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला की, नाल्यांची नैसर्गिक रुंदी कायम राहणार की नाही? तसेच नाल्यांजवळील वस्त्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत सरकार कोणती पावले उचलणार आहे? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राठोड म्हणाले की, नाल्यांचे सर्वेक्षण करून, आवश्यकतेनुसार रुंदी वाढवण्याचा विचार केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली भूमी अभिलेख विभाग चौकशी करेल आणि उर्वरित नाल्यांच्या दुरुस्तीबाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवले जातील.
मात्र राठोडांचे उत्तर ऐकून मुनगंटीवारांचे समाधान झाले नाही. ते म्हणाले की, मी विचारलेला मुद्दा स्पष्ट होता की नाल्यांची नैसर्गिक रुंदी कायम ठेवण्याची सरकारची हमी काय? उत्तरात केवळ सजेशन फॉर अॅक्शन दिले. हे तर ॲक्शन, ओन्ली ॲक्शन, नो रिअॅक्शन सारखे उत्तर झाले. ही तर द्वयर्थी उत्तरे आहेत. हे काय दादा कोंडके यांचे उत्तर आहे का? हे द्वयर्थी आहे का? त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.