Olympics Games 2036 | 2036 च्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळांचे (Olympics Games 2036) आयोजन करण्यासाठी भारत इच्छुक आहे. भारताने यजमानपदासाठी अहमदाबाद शहराची नाव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सादर केले आहे.
नुकत्याच भारतीय शिष्टमंडळ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा पी.टी. उषा, केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या प्रतिनिधींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
ब्रिस्बेन 2032 चे ऑलिम्पिक आयोजित करणार असल्याने, भारताने आता 2036 च्या खेळांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतासोबतच 2036 च्या ऑल्म्पिक खेळाचे आयोजन करण्यासाठी सौदी अरेबिया, इंडोनेशिया, तुर्की आणि चिलीसारखे देशही प्रयत्न करत आहे.
IOA च्या अध्यक्षा आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पी.टी. उषा यांनी सांगितले की, “भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केवळ एक क्रीडा स्पर्धा नसेल, तर याचा सर्व भारतीयांवर पिढीजात परिणाम होईल.” 61 वर्षीय उषा यांनी या बोलीला भारताच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला.
भारताचा क्रीडा आयोजनाचा अनुभव
भारताने यापूर्वी 1951 आणि 1982 मध्ये आशियाई खेळांचे यशस्वी आयोजन केले आहे. तसेच, 2010 मध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले, जे भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे बहु-क्रीडा आयोजन होते. या अनुभवाच्या जोरावर भारत 2036 च्या ऑलिम्पिकसाठी मजबूत दावेदार आहे.
2036 साठी तीव्र स्पर्धा
2036 च्या ऑलिम्पिकसाठी भारताला सौदी अरेबिया, चिली, तुर्की आणि इंडोनेशिया यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. सौदी अरेबिया 2034 मध्ये फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे, हा भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. भारताची बोली यशस्वी झाल्यास, जपान (1964), दक्षिण कोरिया (1988) आणि चीन (2008) नंतर भारत हा ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणारा चौथा आशियाई देश बनेल.