National Herald Money Laundering Case | काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर सह-आरोपींच्या सांगण्यावरून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या (एजेएल) 2,000 कोटींच्या मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे.
ईडी दिल्ली न्यायालयाला माहिती देताना याबाबतचा दावा केला आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात विशेष न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ईडीने हा दावा केला.
ईडीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, जर काँग्रेस पक्षाच्या सहभागाचे पुरावे आढळले, तर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीलाही (एआयसीसी) या प्रकरणात आरोपी बनवले जाऊ शकते. “आम्ही एआयसीसीला अद्याप आरोपी केले नाही, पण पुरावे मिळाल्यास हा अधिकार आमच्याकडे आहे,” असे वकिलांनी स्पष्ट केले.
यंग इंडियन आणि बनावट व्यवहार
ईडीने दावा केला की, यंग इंडियन ही संस्था सोनिया आणि राहुल गांधींच्या नियंत्रणाखाली होती, ज्यांनी 76% समभाग ताब्यात घेतले होते. उर्वरित 24% समभाग काँग्रेसचे दिवंगत नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होते. ईडीच्या मते, यंग इंडियन ही एक बनावट संस्था होती, जी केवळ 50 लाख रुपये देऊन एजेएलच्या 2,000 कोटींच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थापन करण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी बनावट व्यवहार आणि आगाऊ भाडे वसूल करून फसवणूक केल्याचा आरोपही ईडीने केला.
9 एप्रिल 2025 रोजी ईडीने सोनिया गांधी, राहुल गांधी, सुमन दुबे, सॅम पित्रोदा, यंग इंडियन, डोटेक्स मर्चंडाइज आणि सुनील भंडारी यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंगची तक्रार दाखल केली. या प्रकरणात कथितरित्या 5,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या गुन्हेगारी उत्पन्नाचा समावेश आहे, ज्यात 142 कोटींचे भाडे उत्पन्न आहे. न्यायालय पुढील युक्तिवाद ऐकून आरोपपत्राची दखल घेण्याचा निर्णय घेईल.