मुंबई – महायुतीत (Mahayuti) वाद होईल, अशी कोणतीही वक्तव्ये टाळा. विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी स्पष्ट आणि सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devenadra Fadnvis) यांनी महायुतीतील वाचाळवीर आमदार (MLA) आणि मंत्र्यांना (Ministers) दिली आहे.
मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या आमदारांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात फडणवीसांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्व आमदार आणि मंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात सतर्क रहा. सध्या महायुतीतील काही आमदार विविध मुद्द्यांवर एकमेकांविरोधात वक्तव्य करताना दिसत आहेत. ही बाब विरोधकांच्या हातात मुद्दा देणारी ठरते. त्यामुळे महायुतीत फूट पडेल किंवा मतभेद आहेत, असा संकेत देणारी कोणतीही विधाने टाळा. त्याचबरोबर सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे.
अधिवेशनाच्या रणनीतीसोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीसाठीही फडणवीसांनी संकेत दिले. ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांनी अधिक सक्रिय राहावे. आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून कार्य करावे. सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता, सर्वांनी सोशल मीडियावरही (Social media ) प्रभावीपणे सक्रिय राहावे.