मुंबई- भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया खात्यांवर बंदी घातली आहे. अवघ्या एका दिवसासाठीच ही खाती भारतीय युजर्ससाठी पुन्हा दृश्यमान झाली होती. मात्र, आज सकाळपासून शाहिद आफ्रिदी, मावरा होकेन, युमना झैदी, हानिया आमिर आणि फवाद खान यांसारख्या सेलेब्रिटींची इंस्टाग्राम व एक्स खाती पुन्हा ब्लॉक झाली आहेत.
काल अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया खाती अचानक भारतात दिसू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर ही बंदी मागे घेतल्याचे सांगण्यात येते. पण केवळ २४ तासांनंतर ही खाती पुन्हा बंद केली. इंस्टाग्रामवर या खात्यांचा शोध घेतल्यास, हे खाते भारतात उपलब्ध नाही. कायदेशीर आदेशामुळे या मजकुरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असा संदेश दिसत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर, विशेषतः भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई करत राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर ही बंदी लागू करण्यात आली होती. यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारताच्या कारवाईवर टीका केली होती.