अकोला– अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये (Akot) सावत्र पित्याने (stepfather) आपल्या ९ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिला. यात मुख्य आरोपीने एका मित्राचीही मदत घेतली. मुलगा भविष्यात संपत्तीत हिस्सा मागेल या भीतीने ही हत्या केल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केले आहेत. आकाश साहेबराव कान्हेरकर असे आरोपी पित्याचे नाव आहे. तर गौरव वसंतराव गायगोले असे आरोपीच्या मित्राचे नाव आहे.
मुलगा बेपत्ता (missing) असल्याची तक्रार मृत मुलाच्या आईने अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल होती. मुलगा काल सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कुणालाही न सांगता घराबाहेर गेला आणि तो परत आलाच नाही, असे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तपास सुरू असतानाच अकोट शहरातल्या चौकातील सीसीटीव्ही (cctv)कॅमेर्यात मुलगा आपल्या सावत्र वडिलांसोबत जाताना दिसला. त्यामुळे पोलिसांना वडिलांवर संशय आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावत्र वडिलांची कसून चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आले. सावत्र वडील आणि त्यांचा मित्र गौरव या दोघांनी मुलाला दुचाकीवरून नेले. त्याची हत्या करून त्याचा मृतदेह अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल (forest)परिसरात टाकून दिल्याची कबुली वडिलांनी दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी जवळपास १२ तास शोध मोहीम राबवत मुलाचा मृतदेह शोधून काढला व शवविच्छेदनासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.