नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड (National Herald Case) या बंद पडलेल्या वृत्तपत्राच्या मालकीची २ हजार कोटी रुपयांची मालमत्ता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya gadhi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी अवघ्या ५० लाख रुपयांत बळकावली. गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही या भ्रष्टाचारात सामील आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचलनालयाने (ED) विशेष मनी लाँडरिंग न्यायालयात केला.
ईडीच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना अतिरिक्त महाधिवक्ता एस व्ही राजू यांनी हा आरोप केला. मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजीएल) या कंपनीच्या संचालक मंडळावर गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लावण्यात आली. या संचालकांनी नॅशनल हेरॉल्डच्या नावाने अनेक बनावट आर्थिक व्यवहार केले.सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी अवघे ५० लाख रुपये देऊन एजीएल कंपनीवर पूर्ण ताबा मिळवला. या मालमत्तेचे सध्याचे बाजारमुल्य २ हजार कोटी रुपये आहे. दिल्ली, लखनौ, भोपाळ, इंदूर, पंचकुला आणि पाटणा या शहरांमध्ये एजीएलच्या मालमत्ता आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी वृत्तपत्र चालवण्यासाठी त्या दिल्या होत्या,असे एस व्ही राजू यांनी न्यायालयात सांगितले. ईडीने या प्रकरणी १५ एप्रिल रोजी रितसर खटला दाखल केला आहे. त्याची दैनंदीन सुनावणी सध्या सुरू आहे.
