दिशा सालियनची आत्महत्याच! पोलिसांचा दावा! आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा क्लीनचिट


मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून सिद्ध होत नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. या प्रकरणी आरोप झालेले उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा हत्येशी संबंध असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात यावी, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप करून नवीन एसआयटी नेमली होती.
दिशा हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा दावा करत या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी तिचे वडील सतिश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेन्द्र नगरकर यांनी दिशाच्या मृत्यूच्या दिवशी 8 जून 2020च्या रात्री काय घडले याचा तपशील प्रतिज्ञापत्रात दिला आहे. त्यात म्हटले आहे की, 9 जून 2020 रोजी मालवणी पोलिसांना कांदिवली पश्चिमच्या शताब्दी हॉस्पिटल येथून संदेश मिळाला की दिशा सालियन (28) ही महिला रिजेंट गॅलेक्सी बिल्डिंग, जनकल्याण नगर, मालवणी, मालाड (प.) येथील बाराव्या मजल्यावरील तिच्या फ्लॅट (फ्लॅट क्रमांक 1202) मधून मध्यरात्री 1.20 वाजता खाली पडली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच 2.25 वाजता मृत घोषित करण्यात आले. यावर अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर क्रमांक 85/2020) दाखल करण्यात आली आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. कोविड नियमांनुसार, 9 जून रोजी दिशाचा कोविड चाचणी नमुना घेण्यात आला आणि त्याचा नकारात्मक रिपोर्ट आल्यावर 11 जून रोजी भागवती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू अनैसर्गिक असून उंचावरून पडल्याने अनेक दुखापती होऊन झाल्याचे नमूद आहे.
नगरकर म्हणाले की, दिशा आणि रोहन राय 2019 मध्ये साखरपुडा करून एकत्र राहत होते. हिमांशु, रेशा आणि अंकिता हे त्यांचे मित्र होते. त्यांच्यात वारंवार भेटगाठी होत असत. 2018 मध्ये रोहनच्या पालकांनी मालाड येथील फ्लॅट खरेदी केला होता. मूळची दादरची असलेली दिशा तिथे अधूनमधून रोहनसोबत राहत असे. 5 जून 2020 रोजी रोहनने ‌‘बिंगो‌’च्या जाहिरातीसाठी शूटिंगचे आयोजन केले होते. शूटिंग पूर्ण झाल्यावर 6 जून रोजी, रोहनने दिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये हिमांशु शिखारेही सहभागी झाला होता. 7 जून रोजी दीप, इंद्रनील आणि रेशा पाडवाल हे मित्रही आले. सर्वांनी बिअर प्यायली, चित्रपट पाहिले, संगीत ऐकले आणि उशिरा झोपले. 8 जून रोजी रात्री सर्व मित्र वेगवेगळ्या खोल्यांमध्ये होते. रात्री 12 वाजता सर्वजण पुन्हा एकत्र आले. त्यांनी मद्यपान केले आणि काही खेळ खेळले. थोड्या वेळाने दिशा बेडरूममध्ये गेली. ती रडत होती. रेशाने इंद्रनीलला काय झाले विचारले, तर तो म्हणाला की दिशा अस्वस्थ आहे. थोड्याच वेळात हिमांशुने रोहनला सांगितले की दिशा खूप अस्वस्थ आहे. तिने दुसऱ्या बेडरूममध्ये स्वतःला बंद करून घेतले आहे. बराच वेळ टकटक केल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यामुळे रोहनने दरवाजा तोडला. मात्र दिशा त्या खोलीत नव्हती. रोहनने खिडकीतू पाहिले तर दिशा रक्ताच्या थोरोळ्यात कंपाउंडमध्ये पडली होती. रोहन आणि इंद्रनील
दोघेही हादरले आणि रडू लागले. हिमांशुने तिला इंद्रनीलच्या कारने खाली आणले. काही खासगी हॉस्पिटलने तिला नाकारल्यामुळे, तिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
नगरकर म्हणाले की, दिशासोबत उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे जबाब नोंदवण्यात आले. तिची लंडनस्थित मैत्रिण अंकिता सुतार हिचा जबाबही 10 जून रोजी घेण्यात आला. कुटुंबातील वाद व व्यवसायात झालेल्या अपयशामुळे तिच्यावर खूप मानसिक तणाव होता. रोहन व त्याचे मित्र तिला टाळत आहेत, असे तिला वाटत होते. 5 जून रोजी मध्यरात्री तिने सांगितले होते की, मी काहीच कामाची नाही. रोहनने तिला समजावले होते. मृत्यूपूर्वी तिने खूप मद्यप्राशन केले होते. कलिना येथील प्रयोगशाळेतील रक्त तपासणी अहवालातून ते स्पष्ट झाले आहे. त्या रात्री फ्लॅटमध्ये उपस्थित सर्वांचे जबाब सुसंगत होते. यातून दिशाने स्वतःच खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली, असा निष्कर्ष निघतो.
मुंबई पोलीस आपल्या दाव्यावर ठाम असले तरी राज्य सरकारने या प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे सरकार या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचे सांगत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पोलिसांनी क्लीन चिट मिळाल्यानंतर आ. आदित्य ठाकरे म्हणाले की, गेली पाच वर्षे अनेक जण माझ्या बदनामीचा प्रयत्न करत होते. त्यावर तेव्हाही मी काही बोललो नव्हतो. आजही बोलणार नाही. कारण दूरदूर माझा त्या विषयाशी संबंध नाही, मला माहीत नाही, त्यावर बोलून काही उपयोग नाही.