पंढरपूर – आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हालेली आहे. लाखो वारकर्यांच्या उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) हे पहाटे २.२० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. ते आजच पंढरपूरला पोहोचले आहेत. यासाठी मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त आणि विशेष नियोजन करण्यात आले आहे. शहरातील मुख्य वेशी, रस्ते आणि मंदिर परिसर विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने नटले आहेत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठलच्या गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी विशेष सजावट करण्यात आली आहे. पुण्याचे भक्त भारत भुजबळ यांच्या वतीने झालेल्या या सजावटीत १० टन देशी-विदेशी फुलांचा आणि १५ टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे. झेंडू, गुलाब, जरबेरा, मोगरा, गुलछडी यांसारख्या फुलांसोबतच विविध प्रकारची फळेही सजावटीत वापरण्यात आली आहेत. मंदिराचा गाभारा, सभामंडप, चौखांबी व सोळखांबी भाग आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. ही देखणी सजावट पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.