‘मला अजून 30-40 वर्षे जगण्याची आशा’, आध्यात्मिक गुरु दलाई लामा झाले 90 वर्षांचे; जगातून शुभेच्छांचा वर्षाव

Dalai Lama Birthday

Dalai Lama Birthday | तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama Birthday) यांनी आज (6 जुलै) आपला 90 वा वाढदिवस साजरा केला. धर्मशाळेतील मॅक्लिओडगंज येथील मुख्य मंदिरात दीर्घायुष्य प्रार्थना समारंभात हजारो अनुयायांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही दलाई लामांना शुभेच्छा दिल्या. मागील काही दिवसांपासून दलाई लामांच्या उत्तराधिकारीवरून चर्चा सुरू आहे. यावरून भारत आणि चीनमधील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत दलाई लामांना “प्रेम, करुणा आणि नैतिक शिस्तीचे प्रतीक” संबोधले. त्यांनी दलाई लामांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी तिबेटी लोकांच्या मानवी हक्क आणि सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची पुनरुक्ती केली.

वाढदिवसाच्या एक दिवसआधी दलाई लामा म्हणाले की, लोकांना सेवा देण्यासाठी त्यांना आणखी 30 ते 40 वर्षे जगायची आशा आहे. “मी आतापर्यंत बुद्ध धर्म (Buddha dharma) आणि तिबेटच्या प्राण्यांची ़बरीच चांगली सेवा करू शकलो आहे, आणि मला 130 वर्षांहून अधिक जगायची आशा आहे,”

उत्तराधिकारी वाद

दलाई लामांनी आपला पुनर्जन्म “मुक्त जगात” होईल आणि त्यांच्या ‘गदेन फोड्रंग ट्रस्ट’कडेच उत्तराधिकारी निवडीचा अधिकार असेल, असे म्हटले आहे. यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला आणि तिबेटी बौद्ध धर्म “चिनी वैशिष्ट्यांसह” आहे आणि पुनर्जन्माला बीजिंगच्या मान्यतेची गरज आहे, असे प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले. त्यांनी ‘सुवर्ण कलश’ पद्धतीचे पालन अनिवार्य असल्याचे नमूद केले. या वादामुळे भारत-चीन संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी भारत धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दलाई लामांचे भक्त असल्याचे सांगत हा धार्मिक मुद्दा असल्याचे म्हटले आहे.