भाजपा नेते हाकेंकडून औत ओढत शेतकऱ्यांची थट्टा

BJP leader Stunt in Farm

लातूर – शेतीच्या मशागतीसाठी पैसे आणि बैल नसल्याने अंबादास गोविंद पवार (७५) यांनी स्वत:ला औताला जुंपले होते आणि त्यांची पत्नी त्यांना मदत करत होती. याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्यांना मदत केली , पण या शेतकऱ्याला भेटायला गेलेले भाजपा (BJP) नेते गणेश हाके (Ganesh Hake) यांच्यावर आता मदतीच्या नावाखाली थट्टा केल्याचा आरोप होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावात अंबादास पवार यांना भेटण्यासाठी गेलेले गणेश हाके यांनी स्वतः औत ओढून पाहिला. एवढ्यावर न थांबता त्यांच्या भोवती असलेल्या लोकांनी हाके औत ओढत असल्याचा व्हिडीओ शूट करून समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यानंतर हे शेतकऱ्याला मदत करायला गेले होते की शेतकऱ्याची चेष्टा करायला?असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.

या प्रकरणावर टीका होताच गणेश हाके स्पष्टीकरण देत म्हणाले की, अंबादास पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई गेली १० वर्षे बैलाशिवाय शेती करत आहेत. त्यांच्या कष्टांचा अनुभव घेण्यासाठी मी औत ओढला. हा ७५ वर्षांचा शेतकरी कष्ट करतो. तो औत ओढून पाहिल्यानंतर मला कळाले की हा शेतकरी किती कष्ट घेत आहे. मी तिकडे गेलो तेव्हा तेथील प्रसारमाध्यमांनी माझा व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ मी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला नाही. मी कोणाचीही थट्टा केली नाही.