सावंतवाडी- हिंदी भाषेचा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर जो विजयी मेळावा पार पडला त्यात तब्बल १९ वर्षांनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले आणि दोघांनीही दमदार भाषणे केली. त्यामुळे आनंदित झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray group) कार्यकर्त्यांनी प्रथमच एकत्र येऊन जल्लोष केला.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर समाधान व्यक्त केले. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ म्हणाले,महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. ही महाराष्ट्राच्या विकासाची नांदी आहे आणि याच एकजुटीसाठी आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत.तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड.अनिल केसरकर म्हणाले, मुंबईत आज मराठी माणूस एकत्र आला आणि त्याचीच झलक सिंधुदुर्गातही दिसून आली आहे. मराठी माणसाच्या वाटेला कोणी गेल्यास तो कसा पेटून उठतो, हे आज सर्वांना समजले असेल.