मी पाकचा विश्वासू एजंट होतो! तहव्वुर राणाची स्पष्ट कबुली

नवी दिल्ली- मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो, पाकिस्तानी लष्कराने मला प्रशिक्षण दिले व ज्यावेळी 26/11 चा कट शिजवण्यात आला व जेव्हा हा हल्ला करण्यात आला तेव्हा मी मुंबईतच होतो अशी स्पष्ट कबुली मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या मास्टर माईंडचा खास सहकारी तहव्वुर राणा याने दिली आहे. तहव्वुर राणा सध्या तिहार कारागृहात राष्ट्रीय तपास पथकाच्या कोठडीत असून, त्याची नुकतीच मुंबईच्या गुन्हे अन्वेषण पथकाने चौकशी केली. या चौकशी दरम्यान त्याने ही कबुली देत या कटाविषयीची अधिक माहितीही दिली आहे. मुंबई क्राईम ब्रांच लवकरच त्याची कोठडी मागण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर त्याची अधिक चौकशी करण्यात येईल.
आपल्या चौकशीदरम्यान राणाने सांगितले की, तो आणि त्याचा प्रमुख डेव्हिड हेडली याने पाकिस्तानमधील लष्कर- ए-तोयबाच्या विविध प्रशिक्षण शिबिरांना हजेरी लावली होती. त्यांना विशेष करून गुप्तहेरांच्या कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. भारतात इमिग्रेशन कंपनी सुरू करण्याची कल्पना माझीच होती. त्या माध्यमातूनच या कटासाठी नेटवर्क तयार करण्यात आले. या कंपनीच्या व्यवहारांमधून सामान्य उलाढाल दाखवण्यात आली. 26/11 च्या हल्ल्याचा कट रचण्यात आला तेव्हा मी मुंबईतच होतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची मी रेकी केली होती. त्यावेळी आयएसआयच्या मदतीने इथे हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयची महत्त्वाची भूमिका होती. मला पाकिस्तानी लष्कराने खलीज युद्धाच्या दरम्यान सौदी अरेबियात पाठवले होते. त्या ठिकाणीही मला प्रशिक्षण मिळाले.
त्याच्या या कबुलीजबाबानंतर आता मुंबई क्राईम ब्रांच त्याला ताब्यात घेण्याची तयारी करत असून, त्याला मुंबईत आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने तहव्वुर राणा हा तपास कामात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगितले असून, त्यासाठी त्याच्या कोठडीची मुदत वाढवण्यात आली होती. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणले गेले. मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या या हल्ल्यात तब्बल 166 जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक जखमी झाले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज महाल हॉटेल, कुलाब्याचे ज्यू सेंटरसह विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेल्या अजमल कसाबवर खटला चालवून त्याला फाशी देण्यात आले होते.
हाफिज सईद व मसूद अझहरचे प्रत्यार्पण करू! भुत्तोंचा प्रस्ताव
पाकिस्तानातील अतिरेकी हाफिज सईद व मसूद अझहर यांचे भारताच्या मागणीप्रमाणे प्रत्यार्पण करण्यात यावे असा प्रस्ताव पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी दिला आहे. अल जजिरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. बिलावल भुत्तो म्हणाले की, लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांच्या प्रत्यार्पणाला काहीही हरकत नाही. जर दिल्लीने या संदर्भात सहकार्याची भूमिका घेतली तर आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ. दरम्यान बिलावर भुत्तो यांच्या या विधानाने लष्कर ए तोयबाचा प्रमुख हफिज सईद याचा मुलगा तलहा याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने बिलावल भुत्तोवर कठोर शब्दात टीका केली आहे. बिलावल भुत्तो यांच्या या विधानाने पाकिस्तानला लाज आणली असून यांच्या प्रत्यार्पणाऐवजी भारतीय नेत्यांनाच पाकिस्तान मध्ये आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. भुत्तो यांची स्वतःची विश्वासार्हता काय आहे ? भुत्तोच्या कुटुंबाने पाश्चात्य संस्कृती व भारताचा प्रचार केला आहे असेही त्याने म्हटले आहे.