वियान मल्डरने ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम का मोडला नाही? स्वतःच सांगितले कारण

Wiaan Mulder Test Cricket Record

Wiaan Mulder Test Cricket Record | दक्षिण आफ्रिकेचा हंगामी कर्णधार वियान मल्डरने (Wiaan Mulder) झिम्बाब्वेविरुद्धच्या (South Africa vs Zimbabwe) दुसऱ्या कसोटी सामन्यात 367 धावांवर नाबाद असताना डाव घोषित केला. मल्डरची फलंदाजी पाहून अनेकांना तो दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा (Brian Lara) 400 धावांचा कसोटी विक्रम मोडणार असे वाटत होते. मात्र, त्याने त्याआधीच डावाची घोषणा केली.

मल्डरने 367 धावांवर असताना डाव घोषित केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. आता यामागचे कारण स्वत मल्डरने सांगितले. लारा हा ‘लेजेंड’ असून, त्याचा विक्रम कायम राहावा, यासाठी आणि संघाच्या रणनीतीसाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.

मल्डरचे स्पष्टीकरण

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सुपरस्पोर्टशी बोलताना मल्डर म्हणाला की, “मला वाटले की आम्ही पुरेसा स्कोअर केला आहे आणि आता गोलंदाजी करणे आवश्यक आहे. आणि दुसरे म्हणजे ब्रायन लारा एक लेजेंड आहे, हे वास्तव आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 400 धावा केल्या होत्या. आणि त्याच्यासारख्या व्यक्तीने तो विक्रम कायम ठेवणे खूप खास आहे. मला वाटते की जर मला पुन्हा संधी मिळाली, तर मी कदाचित तेच करेन. मला आठवते, मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी मलाही सांगितले होते की ‘लेजेंड्सना खूप मोठे स्कोअर (big scores) कायम ठेवू द्या’.”

27 वर्षीय अष्टपैलू मल्डरने 334 चेंडूंमध्ये 49 चौकार आणि 4 षटकारांसह 367 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 625/6 वर डाव घोषित केला, ज्यामुळे झिम्बाब्वेवर दबाव वाढला.

मल्डरने 109.88 च्या स्ट्राइक रेटने 367 धावांची खेळी साकारली, ज्याने हाशिम आमलाचा 2012 चा 311 धावांचा दक्षिण आफ्रिकन विक्रम मागे टाकला. “हाशिमचा स्कोअर पार करणे खास होते. मी कधी दुहेरी किंवा तिहेरी शतकाचे स्वप्नही पाहिले नव्हते,” असे मल्डर म्हणाला. यापूर्वी त्याने मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते, परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील अपयशानंतर त्याच्यावर सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, त्याच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेला सामन्यात मजबूत स्थिती मिळाली. दुसऱ्या दिवसाअखेर झिम्बाब्वेचा दुसऱ्या डावातील स्कोअर 51/1 होता. ते दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीपेक्षा 405 धावांनी मागे आहेत.