मुंबई – नर्मदा नदीच्या पाणी वाटपावरून विधान परिषदेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Kadase) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गुजरातने (Gujrat)गेल्या ४५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या वाट्याचे ११ टीएमसी पाणी वापरल्याचा आरोप खडसेंनी करत, हे पाणी अडवणार की नाही? असा थेट सवाल महाजनांना केला.
खडसे म्हणाले की, गुजरात हे पाणी वापरत आहे आणि आपण दुर्लक्ष करत आहोत. आपण आता उपाययोजना केल्या नाहीत, तर गुजरात हे पाणी पुढील अनेक वर्ष वापरत राहील. हे थांबवायलाच हवे.
त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देताना खडसेंना कोंडीत पकडले. ते म्हणाले की, तुम्ही ज्याचा उल्लेख करता, तो काही करार नाही, तर लवादाचा निर्णय आहे. तो मला मिळालेला नाही. खडसेंनी अभ्यास करून बोला, त्यानंतर मी उत्तर देईल.
त्यानंतर खडसे यांनी प्रत्युत्तरात म्हटले की , हा विषय लवादाचा की कराराचा हे महत्त्वाचे नाही. हा आदिवासी भागातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न आहे. माझ्याकडे कागदपत्रे नाहीत. पण गॅझेट आहे आणि मी ते वाचून दाखवू शकतो.
महाजन यांनी स्पष्ट केले की, लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १०.८९ टीएमसी पाणी मिळते. हे पाणी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांना देण्यासाठी दोन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. हे भाग डोंगराळ असल्यामुळे अडचणी येत आहेत. मात्र, त्यासाठीचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, ८-१० महिन्यांत मंजुरी मिळेल आणि एक वर्षात पाणी पोहोचवले जाईल.