आलिया भट्टला पर्सनल असिस्टंटनेच घातला गंडा, 76 लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकी प्रकरणी अटक

Alia Bhatt PA Arrested

Alia Bhatt PA Arrested | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) माजी वैयक्तिक सहाय्यक वेदिका प्रकाश शेट्टीला (Vedika Prakash Shetty) जुहू पोलिसांनी बंगळूरूमधून अटक केली आहे. वेदिकावर आलिया आणि तिच्या ‘एटर्नल सनशाईन प्रॉडक्शन्स’मधून 76.9 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे.

बनावट बिलांद्वारे आणि आलियाच्या स्वाक्षरीची नक्कल करून ही फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आलियाची आई सोनी राझदान यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला होता.

प्रकरण काय आहे?

पोलिसांच्या माहितीनुसार, मे 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत वेदिकाने आलियाच्या वैयक्तिक आणि प्रॉडक्शन हाऊसच्या खात्यातून पैसे वळवले. तिने बनावट बिले तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला आणि आलियाच्या स्वाक्षरीची नक्कल करून ही रक्कम साथीदाराच्या खात्यात वळवली. रिपोर्टनुसार, तिने एकूण 76,90,892 रुपयांची अफरातफर झाली. तपासासाठी पोलिस आता वेदिकाच्या बँक खात्यांची आणि आर्थिक नोंदींची छाननी करत आहेत.

सोनी राझदान यांनी 23 जानेवारी 2025 रोजी वेदिकाविरुद्ध आर्थिक गैरवर्तणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. पाच महिन्यांच्या तपासानंतर मुंबई पोलिसांनी वेदिकाला बंगळूरूमधून अटक केली. आलिया किंवा तिच्या टीमने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.

वेदिका प्रकाश शेट्टी कोण आहे?

वेदिका प्रकाश शेट्टी दोन वर्षांहून अधिक काळ आलियाची वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होती. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक व्यवहारांची (personal and business dealings) जबाबदारी तिच्यावर होती, ज्यात तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कामकाजावर देखरेख करणे देखील समाविष्ट होते.