Donald Trump Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तांब्याच्या (copper Tariffs) आयातीवर 50% नवीन शुल्क जाहीर केले. यापूर्वी त्यांनी पोलाद आणि ॲल्युमिनियमवरही अशाच प्रकारचे शुल्क लादले होते.
याशिवाय, पुढील वर्षी औषधांच्या आयातीवर 200% पर्यंत शुल्क वाढण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. भारतासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण अमेरिका ही भारताच्या औषधनिर्मिती आणि तांब्याच्या निर्यातीची मोठी बाजारपेठ आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत ट्रम्प यांनी तांब्यावर 50% शुल्क लादत असल्याची माहिती दिली. वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले की, हे शुल्क जुलै अखेरीस किंवा 1 ऑगस्टपर्यंत लागू होईल. औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना कामकाज अमेरिकेत हलवण्यासाठी एक वर्षाचा अवधी देण्यात येईल, अन्यथा 200% शुल्क लागू होईल.
ट्रम्प यांनी यापूर्वीद BRICS देशांवर 10% शुल्काची धमकी देत अमेरिकन डॉलरला आव्हान देणाऱ्या देशांना इशारा दिला.
भारतावर परिणाम
2024-25 मध्ये भारताने 2 अब्ज डॉलर किमतीचे तांबे आणि तांब्याची उत्पादने निर्यात केली, यापैकी 360 दशलक्ष डॉलर अमेरिकेला गेले. तांब्याचे शुल्क वाढल्यास भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, परंतु देशांतर्गत उद्योग मागणी शोषून घेऊ शकतात.
मात्र, औषधनिर्मिती क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. अमेरिकेत भारताची 9.8 अब्ज डॉलरची औषध निर्यात आहे, जी एकूण निर्यातीच्या 40% आहे. 200% शुल्कामुळे जेनेरिक औषधांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टपूर्वी हा करार झाल्यास शुल्कांचा परिणाम कमी होऊ शकतो.