ERASR Rocket | भारताने सागरी संरक्षणाला बळकटी देताना आयएनएस कवरत्ती (INS Kavaratti) जहाजावरून ‘एक्स्टेंडेड रेंज अँटी-सबमरीन रॉकेट’ (ERASR) च्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या पाणबुडीविरोधी रॉकेटची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे रॉकेट लवकरच भारतीय नौदलात सामील होणार आहे. 23 जून ते 7 जुलै 2025 दरम्यान झालेल्या चाचण्यांनी भारताच्या नौदल क्षमतेत महत्त्वाचा टप्पा गाठला, जे संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे.
ERASR ची निर्मिती
DRDO च्या पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्थेने (ARDE) ERASR ची निर्मिती केली आहे, ज्यात हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी यांचे सहकार्य लाभले. हे रॉकेट नौदलाच्या स्वदेशी लाँचरसाठी डिझाइन केले असून, पाणबुड्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. याची दुहेरी-रॉकेट मोटर रचना आणि स्वदेशी इलेक्ट्रॉनिक टाइम फ्युज उच्च अचूकता आणि कार्यक्षमता प्रदान करते.
17 रॉकेट्सच्या चाचण्यांमध्ये रेंज, वॉरहेड कार्यक्षमता आणि ऑपरेशनल विश्वासार्हता यशस्वीरीत्या सिद्ध झाली. भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या रॉकेट्सचे उत्पादन करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने या यशाला भारताच्या संरक्षण उद्योगासाठी महत्त्वाचे पाऊल ठरवले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, नौदल आणि उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले. “ERASR नौदलाची मारक क्षमता वाढवेल आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या दृष्टिकोनाला बळ देईल,” असे त्यांनी सांगितले.