‘देश सोडून दुबईला राहायला जा…’, मराठी-हिंदी भाषा वादावर उद्योजकाची पोस्ट चर्चेत

Marathi Language Row

Marathi Language Row | गेल्याकाही दिवसांपासून विविध राज्यांमध्ये हिंदीला विरोध करत स्थानिक भाषेचा वापर करावा, अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मराठी आणि कर्नाटकमध्ये कन्नड भाषेच्या सक्तीवरून राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता एका स्टार्टअप संस्थापकाने थेट दुबई किंवा सिंगापूरला स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी-हिंदी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षत श्रीवास्तव यांनी उद्योजकांना दुबई-सिंगापूरला राहायला जाण्याचा सल्ला दिला. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या देशांमध्ये स्थानिक भाषा शिकण्याची सक्ती नाही आणि उद्योजकांना चांगल्या संधी मिळू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबईत मराठी न बोलल्याने दुकानदार आणि व्यवसायिकांना झालेल्या मारहाणीनंतर हा सल्ला चर्चेत आला आहे.

अक्षत श्रीवास्तव यांची पोस्ट व्हायरल

श्रीवास्तव यांनी ‘एक्स’वर लिहिले, “दुबई किंवा सिंगापूरला जा. तेथे स्थानिक भाषा शिकण्याची सक्ती नाही. कायद्याचे पालन करा, अर्थव्यवस्थेत योगदान द्या आणि चांगल्या सुविधा, करिअरच्या संधी मिळवा.”

त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून, अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण भाषेची सक्ती नको असे मत व्यक्त करत आहेत, तर काहींनी ज्या राज्यात राहत आहोत, तेथील स्थानिक भाषा बोलता यावी असे मत व्यक्त केले आहे.