नवी दिल्ली –कामगार संघटनांनी (Labor unions) केंद्र सरकारच्या (central government) चार नव्या श्रम कायद्यांच्या विरोधात आज देशव्यापी भारत बंद पुकारला. या आंदोलनात देशभरातील दहा प्रमुख कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. नव्या श्रम कायद्यांमुळे संप करणे कठीण होईल. तसेच कामाचे तास वाढवण्यात आले आहेत. तसेच नोकरीची सुरक्षा, वेतन (Salary)आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. कंपनी मालकांना शिक्षेपासून संरक्षण देणाऱ्या या कायद्यांमुळे कामगारांचे हक्क डावलले जात असल्याचा संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीचा अंत, सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध, आणि किमान वेतन २६,००० रुपये करण्याच्या मागणीसह १७ कलमी मागण्यांसाठी कामगार संघटनांनी केंद्र सरकार विरोधात संप पुकारला.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (All India Trade Union Congress), एनएमडीसी (NMDC), खनिज व पोलाद कंपन्यांचे कर्मचारी, बँका (bank), विमा कंपन्या, राज्य सरकारी विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांनीही संपाला पाठिंबा दिला. भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पश्चिम बंगालमध्ये दिसला. कोलकातामध्ये कामगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काही ठिकाणी जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळेवर पोहोचून आग विझवली. राज्यभरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जादवपूर रेल्वे स्थानकाजवळ डाव्या पक्षांचे कार्यकर्ते रेल्वे रूळांवर बसून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते, त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. जादवपूर परिसरात डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी मोर्चा काढला. त्यात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले. मिदनापूर सेंट्रल बस स्थानकाजवळ वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोलकातामध्ये काही ठिकाणी खासगी आणि सरकारी बस सेवा सुरू होत्या. बसचालकांनी हेल्मेट घालून बस चालवली. हावडा येथे पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना पांगवले. केरळमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. आरोग्यसेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प राहिले.
तमिळनाडूमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. झारखंडमधील रांची येथे सीएमपीडीआय कार्यालयाबाहेर निदर्शने झाली. बिहारमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. जेहानाबाद येथे आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग-८३ अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी पाच आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. रांचीमध्ये एआयटीयुसी कार्यकर्त्यांनी सीएमपीडीआय मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. ओडिशामधील भुवनेश्वर येथे सीआयटीयू कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवला. कटक आणि पुरी येथे किरकोळ आंदोलने झाली. कोट्टायम व कोइमतूरमध्ये मॉल व दुकाने बंद ठेवण्यात आली. दिल्ली-एनसीआरमध्ये भारत बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. महाराष्ट्रात बंदचा प्रभाव मर्यादित राहिला.