बरेली- हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बरेली येथील कावड मार्गावरील दुकानांवर मी हिंदू (HINDU)आहे! असे फलक लावले आहेत. दुकानदारांच्या आधारकार्डाच्या सहाय्याने त्यांच्या धर्माची ओळख पटवून हे फलक लावण्यात आले आहेत. हा आमच्यावरचा अविश्वास असल्याचे म्हणत मुस्लीम समाजाने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
कावड यात्रा करणाऱ्या कोणत्याही भाविकाचा उपवास दुषित अन्नपदार्थांमुळे तुटू नये यासाठी हे फलक लावण्यात आल्याचे हिंदू महासभेने म्हटले आहे. या आधी उत्तर प्रदेश सरकारनेही (UP Goverment) दुकानांच्या बाहेर मालकाचे नाव ठळकपणे लावण्याचा आदेश दिला होता. कावड यात्रेच्या तयारी संदर्भात माहिती देताना पोलीस आयुक्त राजीव खन्ना यांनी म्हटले आहे की, कावड यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात आले असून जागोजागी वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या मार्गांवरील सर्व मद्याची दुकाने झाकण्यात आली आहेत. हिंदू महासभेच्या कृत्याचे समर्थन करण्यात येणार नाही. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
हिंदू महासभेच्या या कृत्याबद्दल मुस्लीम समाजाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा धर्माधर्मात फूट पाडण्याचा प्रकार असून आमच्यावरचा अविश्वास दाखवण्यासारखे आहे. हा जाती-धर्मांमधील तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार कावड यात्रेच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारा आहे. आम्हालाही व्यवसाय करण्याची समान संधी मिळायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.