Shahapur School | ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर. एस. दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये मासिक पाळीच्या बहाण्याने विद्यार्थिनींना विवस्त्र करून मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी मुख्याध्यापिका, तीन शिक्षिका आणि एक महिला कर्मचारी यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पाच आरोपींना कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षितता आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
नेमकं काय घडलं?
शहापूरच्या या शाळेत 300 मुली शिक्षण घेतात. 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनींना हॉलमध्ये बोलावले. बाथरूममधील रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवत मासिक पाळीची विचारणा केली. ज्या मुलींना मासिक पाळी आली होती, त्यांचे हाताचे ठसे घेण्यात आले, तर नसल्याचे सांगणाऱ्या मुलींना बाथरूममध्ये नेऊन विवस्त्र तपासणीला सामोरे जावे लागले.
9 जुलै रोजी पालकांनी शाळेत धाव घेऊन गोंधळ घातला आणि हा प्रकार उघडकीस आणला. पालकांनी मासिक पाळीवर योग्य शिक्षण देण्याऐवजी मुलींना अपमानित केल्याचा आरोप केला.
शहापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत आठ जणांवर गुन्हा दाखल केला. यात मुख्याध्यापिका, तीन शिक्षिका, दोन महिला कर्मचारी आणि एक शिपाई यांचा समावेश आहे. पाच जणांना अटक झाली असून, संस्थाचालक आणि एक शिक्षिका फरार आहेत.
राज्य महिला आयोगाची भूमिका
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शहापूरला भेट देऊन पालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाळेत तक्रार निवारण समिती नसणे आणि सखी सावित्री समिती केवळ कागदोपत्री असल्याच्या त्रुटी आढळल्या.
मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून, शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवला आहे. चाकणकर यांनी मुलींचे समुपदेशन आणि जलद तपासाचे निर्देश दिले. दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याचेही सांगितले.