Kapil Sharma Cafe Shooting | प्रसिद्ध विनोदी अभिनेता कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कॅनडातील नव्या ‘कॅप्स कॅफे’वर (Kap’s Cafe) अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ब्रिटीश कोलंबियातील सरे आणि डेल्टा शहरांच्या सीमेवर असलेल्या या कॅफेवर झालेल्या हल्ल्यात काच फुटली, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी तपास सुरू केला असून, बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित व्यक्तींनी हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा केला आहे.
नेमकं काय घडलं?
पहाटे 1:50 वाजता सरे पोलिसांना कॅफेवर गोळीबाराची माहिती मिळाली. रिपोर्टनुसार, कॅफेवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे काचेची खिडकी तुटली. एक व्हायरल व्हिडिओमध्ये गोळीबार करणारा व्यक्ती दिसत आहे, पण त्याची पुष्टी झालेली नाही. कॅफे असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अपार्टमेंट्स असल्याने घाबरलेल्या रहिवाशांनी पोलिसांना बोलावले.
सोशल मीडियावर हरजीत सिंग लड्डी आणि तूफान सिंग यांनी, जे बब्बर खालसा इंटरनॅशनलशी जोडले गेले आहेत, हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मधील निहंगांच्या वेशभूषेवर केलेल्या विनोदी टिप्पणींमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे कारण दिले. मात्र, या दाव्याची शहानिशा झालेली नाही, कारण कॅनेडियन सरकारने बब्बर खालसाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.
सरे पोलिसांनी तपास सुरू केला असून, मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी संशयितांचा शोध आणि हल्ल्याचे हेतू तपासण्यास सुरुवात केली आहे.
कपिल शर्माच्या कॅफेने इंस्टाग्रामवर निवेदन जारी करत हिंसेविरुद्ध उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. “आम्ही ‘कॅप्स कॅफे’ उघडले ते स्वादिष्ट कॉफी आणि मैत्रीपूर्ण संभाषणातून आपुलकी, समुदाय आणि आनंद आणण्याच्या आशेने. त्या स्वप्नात हिंसेचा शिरकाव होणे दुखःद आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत, पण आम्ही हार मानणार नाही,” असे कॅफेने म्हटले आहे.