Ahmedabad Plane Crash | अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या भीषण विमान अपघातामागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या 15 पानी प्राथमिक अहवालानुसार, या अपघातात विमानाची दोन्ही इंजिन अचानक बंद पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.
हा अपघात भारतातील अलीकडील काळातील सर्वात भयानक विमान दुर्घटनांपैकी एक ठरला आहे, ज्यात 241 प्रवाशांसह एकूण 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अपघाताचा थरार आणि इंजिन बंद पडण्याचे गूढ
बोइंग 787-8 ड्रीमलाइनर प्रकारचे हे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळले होते, ज्यात केवळ एक प्रवासी बचावला. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताचे मुख्य कारण विमानाच्या दोन्ही इंजिनना इंधन पुरवठा करणारे कटऑफ स्विच एका सेकंदाच्या फरकाने ‘रन’ वरून ‘कटऑफ’वर गेले आणि त्यामुळे इंजिन बंद पडले.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून मिळालेल्या संभाषणातून वैमानिकांमध्ये अपघातावेळी गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले, “तू इंधन का बंद केलं?”, यावर दुसऱ्याने उत्तर दिले, “मी नाही केले.” या संवादातून अचानक घडलेल्या तांत्रिक बिघाडाचा अंदाज येतो. त्यानंतर वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्यात इंजिन 1 काहीसे सुरू झाले, पण इंजिन 2 बंदच राहिले.
फ्लाइट डेटा रेकॉर्डरचे महत्त्वाचे निरीक्षण
विमान उड्डाणानंतर केवळ 32 सेकंदच हवेत राहू शकले आणि त्यानंतर ते रनवेच्या 0.9 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या एका वसतिगृहावर कोसळले. अपघातावेळी थ्रॉटल लिव्हर्स निष्क्रिय अवस्थेत आढळले. मात्र, फ्लाइट डेटा रेकॉर्डरनुसार, उड्डाणादरम्यान थ्रॉटल्स ‘टेकऑफ मोडवर’ होते. यामुळे इंजिन नियंत्रण यंत्रणेत काही तांत्रिक दोष असण्याची शक्यता आहे, असे एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने म्हटले आहे. हा मुद्दा आता पुढील तपासाचा केंद्रबिंदू आहे.
हा प्राथमिक अहवाल असून, पुढील सखोल तपासानंतरच या अपघाताचे नेमके आणि अंतिम कारण स्पष्ट होईल. परंतु, यामुळे विमान सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.