पंढरपूर- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या (Pandharpur) वारीसाठी एसटी महामंडळाकडून पुणे (Pune), मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhajinagar) राज्यातील प्रत्येक एसटी विभागातून विशेष बस (Bus) सोडण्यात आल्या होत्या. त्यामधून ९ लाख ७१ हजार भाविकांनी एसटीने प्रवास केला. त्यामुळे महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.
प्रताप सरनाईक म्हणाले की, आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (ST) विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. ३ ते १० जुलै दरम्यान एसटीने एकूण ५,२०० जादा बसगाड्या सोडल्या आणि त्याद्वारे तब्बल ९,७१,६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्यात आली. या सेवेमुळे एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी अधिक आहे. २०२४ मध्ये आषाढी यात्रेदरम्यान एसटीला एकूण २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न झाले होते. यंदाच्या यात्रेत एसटीने एकूण २१,४९९ फेऱ्या केल्या. भाविकांना त्यांच्या गावांपासून थेट पंढरपूरपर्यंत पोहचवण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठीही ही विशेष वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.