जयंत पाटील भाजपात जाणार? प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई -राज्यात काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती निश्चित झाल्याची माहिती आहे. ते मंगळवार, 15 जुलैपासून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे आता जयंत पाटील भाजपात प्रवेश करतील का, या चर्चेला उधाण आले आहे.
जयंत पाटील हे सांगलीच्या वाळवा मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक निवडणुका लढवल्या. काही ठिकाणी यश मिळाले, तर काही ठिकाणी अपयश पदरी पडले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनापासूनच प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात होते.
अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे नव्या नेतृत्वाची मागणी केली होती. त्याचवेळी शरद पवार यांच्यावर एकतर्फी निर्णय घेतल्याचे आरोपही करण्यात आले. आमदार रोहित पवार यांचाही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला छुपा विरोध असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासमोरच राजीनाम्याची विनंती केली. सात वर्षे काम केले, आता नव्या पिढीला संधी मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
शरद पवारांनी त्यांना निवडणुका होईपर्यंत पदावर राहण्यास सांगितले होते. तरीही त्यांनी त्याआधीच राजीनामा सादर केला. या घडामोडींमुळे त्यांच्या भाजपाप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. कारण, जयंत पाटील यांचे भाजपा नेते मुंडे-महाजन गटाशी जुने संबंध आहेत. एकेकाळी सांगलीतील भाजपाला जेजेपी म्हणजेच जयंत जनता पार्टी अशी ओळख मिळाली होती. ही ओळख पुसण्यासाठी भाजपाचे संजय पाटील यांनी नो जेजेपी, ओन्ली बीजेपी असा नारा दिला होता. जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील हे तत्कालीन जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्या काळात जनता सरकारमध्ये जनसंघाचाही समावेश होता. त्यामुळे भाजपासोबत असलेल्या या पार्श्वभूमीच्या आधारे, जयंत पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील का? की पक्षातच राहून वेगळी भूमिका स्वीकारतील? याबाबत चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून काही निश्चित नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे. माझे नाव चर्चेत आहे, पण निर्णय झाल्यावरच निश्चित काम सुरू करेन.

अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जयंत पाटील शरद पवार गटात अस्वस्थ आहेत, अशी चर्चा होती . त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. ते अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील.

आमदार रोहित पवार म्हणाले की, जयंत पाटील, शरद पवार , सुप्रिया सुळे यांनी ठरवले की बदल झाला पाहिजे. त्यानुसार त्यांनी बदल केले आहेत. याबाबत शरद पवार , सुप्रिया सुळे यांची बैठक झाली होती. मात्र, जयंत पाटील यांनी राजीनामा दिला म्हणून ते भाजपामध्ये जातील असे नाही. ते घाबरणारे नाहीत. आत्तापर्यंत ते शरद पवारांसोबत राहिले आहेत. सत्तेसाठी ते विचार सोडून जाणार नाहीत. सत्ता मिळावी, कुठेतरी मंत्रिपद मिळावे, यासाठी ते शरद पवारांना, लोकांना सोडून जातील, म्हणजेच पळून जातील असे मला वाटत नाही.

रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त मान्य केले असले तरी पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इन्कार केला. ते म्हणाले की, जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत असतो.

वृत्त खोळसाळपणाचे
जितेंद्र आव्हाडांची पोस्ट

रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इन्कार केला. त्यांनी अशी पोस्ट केली की, जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसारच चालत असतो. त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याविषयी गूढ निर्माण झाले आहे.