प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण: 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक

Attack on Pravin Gaikwad

Attack on Pravin Gaikwad | सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काळी शाई आणि वंगण फेकण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनंतर दीपक काटे यांच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

काय घडलं?

अक्कलकोटमधील कमलाराजे चौकातील प्रियदर्शनी हॉलमध्ये जन्मेजय राजे भोसले यांच्या सत्कार समारंभासाठी प्रवीण गायकवाड हजर होते. कार्यक्रमस्थळाकडे जात असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी काळी शाई आणि वंगण फेकले. त्याचबरोबर इनोव्हा गाडीच्या काचेवर दगड फेकून नुकसान केले गेले. या हल्ल्यामागे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात ‘छत्रपती’चा उल्लेख वादाचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे.

संभाजी भोसले यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे,, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर शिरगिरे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण आणि बाबू बिहारी यांच्यावर BNS 2023 कलम 115(2), 189(2), 191(2), 190, 324(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. या प्रकरणात 2 जणांना अटक झाली असून, 5 जणांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, दीपक काटे हे भाजपचे पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यामागे संभाजी ब्रिगेडच्या नावात ‘छत्रपती संभाजी महाराज’चा एकेरी उल्लेख असल्याचा राग असल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची सोलापूरमधील शिवसह्याद्री आरोग्य धाममध्ये तपासणी झाली. त्यानंतर ते अकलूजकडे रवाना झाले. पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे दुग्धाभिषेक आणि फटाक्यांसह जल्लोषात स्वागत केले.