Mahadev Munde Case: बीड- बीड जिल्ह्याच्या परळीत हत्या झालेले व्यापारी महादेव मुंडेंच्या (Mahadev Munde) कुटुंबियांनी आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांच्याकडील ज्वलनशील पदार्थ जप्त केले. पण त्यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी विषप्राशन केल्याने खळबळ उडाली. त्यांना तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालय परिसरात हत्या करण्यात आली होती. या घटनेला जवळपास 20 महिने उलटले तरीही आरोपी फरारच आहेत. या निष्क्रियतेविरोधात मुंडे कुटुंबियांनी वेळोवेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेत आरोपीला अटक करा, अशी मागणी केली. अनेक वेळा आंदोलन, उपोषण केले. पण आपल्याला फक्त आश्वासनेच मिळाली, अशी कुटुंबियांची तक्रार आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा हात असल्याचा कराडचा जुना सहकारी विजयसिंह (बाळा) बांगरने दावा केला. तसेच त्याने चौकशीसाठी सामोरे जाण्यास तयारी दाखवली. त्यानंतर केज पोलिसांनी त्याची चौकशी केली. याबाबत माहिती घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 8 दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी 8 दिवसांत आरोपीला अटक झाली नाही तर कुटुंबासह आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. काल विजयसिंह (बाळा) बांगरने महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आज सकाळी त्यांनी आई-वडील आणि मुलांसोबत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी सर्व कुटुंबियांना ताब्यात घेतले.
या प्रकाराबाबत शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परळीतील महादेव मुंडे खूनप्रकरणी दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परळीतील महादेव मुंडे खूनप्रकरणी दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही यामध्ये एकाही मारेकऱ्यास गजाआड करण्यात आले नाही. तपासात दिरंगाई केली केली जात आहे. मुंडे कुटुंबियांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरे झिजवावे लागतात आणि शेवटी हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. शासनाने तातडीने याबाबत लक्ष घालून या कुटुंबाशी संवाद साधणे गरजेचे आहे.
भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील काही आरोपींवर दुसऱ्या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केली असताना काही आरोपी न्यायालयाच्या आवारात फिरताना दिसतात. ज्यांना आकाने आणले तेच पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. कनिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना चुकीची माहिती देत आहेत. त्यांनी नीट तपास केला तर 8 दिवसांत आरोपी सापडतील.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, बीडमध्ये जेवढे लोक गायब झाले आहेत तेवढे लोक संपूर्ण महाराष्ट्रातून गायब झाले नसतील. आपल्या नवऱ्याची ज्यांनी हत्या केली, त्यांना अटक करावी, या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विषप्राशन केले. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एक भगिनी न्यायासाठी लढा देत असताना न्याय मिळेल, अशी आशा संपल्याने आत्महत्येचा प्रयत्न करीत असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले जात आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना न्याय मिळणार आहे की नाही?
ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड म्हणाले की, माझ्या बहिणीचा संयम सुटला आणि तिने आज आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास वर्ग केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठविण्यात येणार होते. आज व उद्या दोन दिवसांत आरोपीला अटक करतो, असे आश्वासन पोलिसांनी दिले. या प्रकरणात पोलीस विभागाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज असून अधिवेशनात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रश्न
उपस्थित करावा.
