Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघातात पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राच्या दाव्यावर AAIB ने दिले उत्तर

Air India Plane Crash

Air India Plane Crash | अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट 171च्या (Air India Plane Crash) भीषण अपघातात 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आता या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. इंधन स्विच बंद झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले होते. मात्र, आता एका अमेरिकेने या अपघातात पायलटच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलनं या अपघातामागे पायलटची भूमिका असल्याचा दावा केला आहे. मात्र, भारताच्या विमान अपघात तपासणी ब्युरो (AAIB)नं या वृत्ताला जोरदार विरोध दर्शवला आहे. AAIB ने हे वृत्त अस्पष्ट आणि निवडक असल्याचं म्हटलं असून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये, असं आवाहन केलं आहे.

AAIB ने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, त्यांचा प्राथमिक अहवाल फक्त माहिती देण्यासाठी आहे आणि तपास अजूनही सुरू आहे. “या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवासी, कर्मचारी आणि जमिनीवरील लोकांच्या कुटुंबांचं दुःख आम्ही मान्य करतो. पण काही आंतरराष्ट्रीय माध्यमं अपूर्ण माहितीवरून निष्कर्ष काढत आहेत, जे बेजबाबदारपणाचं आहे,” असं AAIBनं म्हटलं आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा केला आहे की, ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगनुसार टेकऑफनंतर काही सेकंदांत 56 वर्षीय कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी इंधन नियंत्रण स्विच बंद केले, ज्यामुळे विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळले. पण AAIB ने असे मत मांडणाऱ्या बातम्यांना फेटाळून लावत तपास कठोर आणि व्यावसायिक पद्धतीनं सुरू असल्याचं सांगितलं.

या अपघातात एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान (Air India Plane Crash) लंडनकडे निघाले होते, पण टेकऑफनंतर लगेचच दुर्घटना झाली. प्राथमिक अहवालानुसार, इंधन स्विच एका सेकंदात रनवरून कटऑफवर गेला होता. कॉक्पीट रेकॉर्डिंगमध्ये वैमानिकांमध्ये इंधन पुरवठ्याबाबत संभाषण ऐकू येते. प्राथमिक अहवालानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क सुरू आहेत.

हे देखील वाचा – विधानभवनात राडा! जितेंद्र आव्हाड-गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांत हाणामारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले…