मुंबई – काल विधानभवनाच्या आवारात झालेल्या राड्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यातील परिस्थिती फडणवीस यांच्या हाताबाहेर गेली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी,अशी मागणी राऊत यांनी केली.
फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्राची संस्कृती दररोज नव्या कारनाम्यांमुळे डागाळत आहे. मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन फिरताहेत, भ्रष्टाचारी, मकोकाचे, खुनाचे आरोपी भाजपामध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दररोज वस्त्रहरण होत आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना धर्मराज युधिष्ठीर जसा खाली मान घालून बसला होता तसेच देवंद्र फडणवीस सध्या खाली मान घालून फिरत आहेत. गुंडांच्या टोळ्या विधानभवनापर्यंत पोहोचून राडेबाजी करत आहेत. उद्या हे लोक आपल्याला विधानसभेत दिसतील.अशीच परिस्थिती जर अन्य राज्यात ओढवली असती किंवा महाराष्ट्रात आमचे सरकार असते तर हेच फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर किंचाळत बसले असते, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली.
काल ज्या गुंडांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काही लोकांवर मकोका अंतर्गत तर काहींवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची सखोल चौकशी करावी,अशी मागणीही राऊत यांनी केली.
