मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मीरा रोडच्या नित्यानंद नगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पुन्हा चेतावणी दिली की, हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर यावेळी केवळ दुकानेच नाही तर शाळाही बंद करू. त्यांनी इशारा दिला की मीरा रोड ते पालघरपर्यंत अमराठी लोकांना आणून त्यांचा मतदारसंघ बनवायचा आणि मग मुंबई गुजरातला जोडायची हे षड्यंत्र सुरू आहे. मात्र आजच्या संपूर्ण भाषणात राज ठाकरे यांनी उबाठाशी युती करण्याबाबत अवाक्षर उच्चारले नाही. उद्धव ठाकरेही आज सकाळी म्हणाले की, आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र राहणारच आहोत. बाकी निवडणूक जाहीर होईल तेव्हा चर्चा होईल. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संभ्रम कायम राहिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, मी इथे मुद्दाम आलो. त्या दिवशी जो प्रसंग घडला, कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच आहे. त्याच्या आरेरावीमुळे कानफटात बसली. मग सर्व व्यापाऱ्यांनी संप पुकारला. त्यांच्या मारली होती का? राजकीय पक्षाला बळी पडून असे काही करतात. महाराष्ट्रात राहात आहात. मराठी शिका, शांत राहा, पण मस्ती केली तर दणका
बसणारच आहे.
हिंदी सक्तीपासून हे सर्व झाले. फडणवीसांनी काल सांगितले की, हिंदी सक्तीची करणाच आहे. सरकारला आत्महत्या करायची तर करू द्या. हिंदी सक्तीची करण्याचा प्रयत्न केला तर दुकाने नाही, शाळाही बंद करीन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो आहे. कोण सक्ती करीत आहे? केंद्राचे सुरुवातीपासून म्हणजे काँग्रेसपासून हे सुरू आहे. मुंबई महाराष्ट्राला देऊ नका, हे वल्लभभाई म्हणजे आपले लोहपुरुष सर्वात आधी बोलले. मोरारजी देसाईंनी लोकांना ठार मारले. या गुजराती लोकांचा डोळा मुंबई आहे. आता हिंदी आणून चाचपडतात की मराठी माणूस जिवंत आहे का? हिंदी भाषा आणणे ही त्यांची पहिली पायरी आहे. मग हळहळू मुंबई गुजरातला मिळवायची आहे.
भाषा आणि जमीन गेली की संपलो. दोन्ही जपणे गरजेचे आहे. गुजरातमधून बिहारी लोकांना बाहेर काढले तर बातमीही आली नाही. मुंबईत घडले की, ती राष्ट्रीय बातमी करतात. आपण कसली हिंदी घेऊन बसलो आहोत? केवळ दोनशे वर्षांपूर्वीची भाषा आहे. मराठी हजारो वर्षांपूर्वीची आहे. हिंदी भाषेला अभिजात दर्जा मिळायला 1200 वर्षे लागतील. ती भाषा आपल्यावर लादणार आहेत. या हिंदी भाषेने कुणाचे भले केले? ते आपल्याकडे नोकरीला येतात. त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला आहे. या देशात हिंदी ही कुणाचीच मातृभाषा नाही. हनुमान चालिसा म्हणतात ती अवधी भाषेत आहे. हिंदी भाषा वाईट नाही, पण आमच्यावर लादणार असाल तर हिंदीत बोलणार नाही.
मुंबईला हात लावायचा असेल तर त्यांना हे सर्व मतदारसंघ अमराठी बनवायचे आहेत. ते तुम्हाला लांब फेकून देणार आहेत. हा अख्खा पट्टा गुजरातला जोडणार आहेत. हे षड्यंत्र लपून सुरू आहे. हा सहज आलेला माज नाही. हा माज तिथून आला आहे. तुम्ही सतर्क राहा. मीरा रोड पासून पालघरपर्यंत त्यांना अमराठी मतदारसंघ करायचा आहे. त्यासाठी त्यांना आणत आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे मालक आणि तुम्ही भीक मागायची? माज घेऊन कुणी अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. दुबे म्हणतो मराठी लोगोंको पटक पटक के मारेंगे| तू आम्हाला मारणार? दुबेला मी सांगतो की, दुबे तुम मुंबई आ जाओ, मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे| सरकार त्यांच्या मागे आहे म्हणून यांची मिजास वाढली आहे. आमची रस्त्यावर सत्ता आहे. पुन्हा कुणी वेडवाकडे बोलले तर मनसैनिक हात आणि गाल एकत्र केल्याशिवाय राहणार नाही. मराठी सर्वांनी शिकण्याचा प्रयत्न करा. मराठीतच बोला.
