INS Nistar | भारतीय नौदलाच्या (Indian Navay) सामर्थ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. देशातच डिझाइन केलेले आणि तयार केलेले पहिले डायव्हिंग सपोर्ट जहाज ‘आयएनएस निस्तार’ (INS Nistar)विशाखापट्टणम येथे नौदलात दाखल झाले.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ने (Hindustan Shipyard Limited) ‘आयएनएस निस्तार’ हे दोन डायव्हिंग सपोर्ट जहाजांपैकी पहिले जहाज तयार केले आहे.
आयएनएस निस्तार’ची वैशिष्ट्ये आणि क्षमता
‘आयएनएस निस्तार’ (INS Nistar) हे अत्यंत अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणांनी सुसज्ज आहे, ज्यात रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स, स्वयंचलित हायपरबॅरिक लाईफ बोट्स आणि डायव्हिंग कॉम्प्रेशन चेंबर्सचा समावेश आहे. हे जहाज 300 मीटरपर्यंतच्या खोलीवर गुंतागुंतीच्या खोल समुद्रातील सॅचुरेशन डायव्हिंग आणि बचाव कार्ये करू शकते. जगातील फार कमी नौदलांकडे ही क्षमता आहे.
हे जहाज खोल समुद्रातील बचाव जहाजांसाठी ‘मदर शिप’ म्हणूनही काम करते, ज्यामुळे नौदलाला संकटात सापडलेल्या पाणबुडीतील कर्मचाऱ्यांना वाचवणे आणि बाहेर काढणे शक्य होते. 118 मीटर लांबीचे आणि 10,000 टनांपेक्षा जास्त विस्थापन असलेले ‘आयएनएस निस्तार’ भारतीय नौदलाच्या पाण्याखालील क्षमतांना बळकटी देते.
या जहाजाच्या निर्मितीमध्ये 120 लघु, मध्यम उद्योगांचा सहभाग असून, 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटक वापरले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जटिल युद्धनौका तयार करण्याच्या भारताच्या क्षमतेचा ‘आयएनएस निस्तार’ हा एक महत्त्वाचा पुरावा आहे.
‘निस्तार’ जहाजाच्या याआधीच्या आवृत्तीची निर्मिती 29 मार्च 1971 रोजी झाली होती आणि तिने 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. विशाखापट्टणम हार्बरच्या बाहेर डायव्हिंग करून पाकिस्तानी पाणबुडी ‘गाझी’ची ओळख ‘निस्तार’नेच केली होती.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि नौदलाचे भविष्य
या सोहळ्यात बोलताना, केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय नौदल आणि स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, स्वदेशी उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे युद्धनौकांमधील स्वदेशी घटकांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ‘आयएनएस निस्तार’च्या समावेशामुळे भारतीय नौदलाची या प्रदेशातील ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ आणि ‘पसंतीचा सुरक्षा भागीदार’ ही भूमिका अधिक दृढ झाली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
स्वदेशी जहाजबांधणी उद्योग ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचेही ते म्हणाले. सध्या, भारतीय शिपयार्ड्समध्ये 57 नवीन युद्धनौकांची निर्मिती सुरू आहे.
हे देखील वाचा –
मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी