Donald Trump: ‘भारत-पाक संघर्षात 5 विमाने पाडली गेली’, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Donald Trump on India Pakistan Ceasefire Claim

Donald Trump on India Pakistan Ceasefire Claim | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षावर (India Pakistan Ceasefire) मोठे विधान करत दावा केला आहे की, मे महिन्यात झालेल्या युद्धसदृश परिस्थितीत सुमारे 5 विमाने पाडण्यात आली होती. यासोबतच त्यांनी हेही पुन्हा सांगितले की, दोन्ही देशांमध्ये त्यांनी व्यापाराच्या माध्यमातून युद्धविराम घडवून आणला.

याआधी देखील ट्रम्प यांनी वारंवार दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच दावा केला.

रिपब्लिकन खासदारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “विमाने हवेतून पाडली जात होती… 4 की 5, पण मला वाटतं 5 विमाने पाडण्यात आली होती.” मात्र, ही विमाने भारताची की पाकिस्तानची, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

भारतीय आणि पाकिस्तानी दावे एकमेकांशी विसंगत

ऑपरेशन सिंदूरनंतर एअर मार्शल ए.के. भारती यांनी भारताने काही हाय-टेक पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. परंतु त्यांनी संख्या उघड केली नव्हती. दुसरीकडे, पाकिस्तानने भारताचा दावा फेटाळून आपल्या फक्त एका विमानाला किरकोळ नुकसान झाल्याचे सांगितले. उलट, पाकिस्तानने राफेलसह एकूण 6 भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला होता.

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानचा दावा फेटाळला आणि संघर्षात काही लढाऊ विमाने पाडली गेली हे मान्य केले, मात्र त्यांनीही कोणतीही निश्चित संख्या दिली नाही. “

‘व्यापाराच्या’ माध्यमातून युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी याआधीही दावा केला होता की, त्यांच्या हस्तक्षेपामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळला आणि मोठे युद्ध टळले. या वेळीही त्यांनी हेच विधान पुन्हा केले. “भारत-पाकिस्तान एकमेकांवर हल्ले करत होते. ते सतत वाढत होते. पण आम्ही व्यापाराच्या माध्यमातून हे थांबवले,” असे त्यांनी म्हटले.

मात्र, या संदर्भात भारताने यापूर्वीच स्पष्ट भूमिका मांडली आहे.भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की युद्धविरामात अमेरिकेची कोणतीही थेट भूमिका नव्हती आणि व्यापारासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नव्हती.

हे देखील वाचा –

मेटाकडून भाषांतरात मोठी चूक, थेट मुख्यमंत्र्यांनाच मृत घोषित केले; आता मागितली माफी

Air India Plane Crash: टाटा समूहाकडून एअर इंडिया AI-171 अपघातग्रस्तांसाठी ट्रस्ट स्थापन, 500 कोटींची करणार मदत

Airtel ग्राहकांना ‘Perplexity Pro’ मोफत! 17,000 रुपये किमतीची AI सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी फ्री; कसे मिळवाल?