बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) यांना मृत घोषित करणारा चुकीचा संदेश मेटाच्या (Meta) ऑटो-ट्रान्सलेशन टूलमधून (Auto-translation tool) प्रसिद्ध झाला. या गंभीर चुकाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मेटाकडे तीव्र आक्षेप नोंदवत तक्रार केली. या संदर्भात मेटाने अधिकृत माफी मागून आपले कन्नड ट्रान्सलेशन (Kannada) फिचर सुधारल्याचे स्पष्ट केले.
१५ जुलै रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनाबाबत शोक संदेश प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, कन्नड भाषेतील या संदेशाचा इंग्रजीमध्ये ऑटो-ट्रान्सलेशन करताना मेटाने चूक केली. या चुकामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निधन झाले असा चुकीचा संदेश फेसबुकवर दिसला.
मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांनी सांगितले की, कन्नडमधून इंग्रजीमध्ये ऑटो ट्रान्सलेशन (auto translation) करताना अशा चुका वारंवार होत आहेत. काही वेळा त्या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या असतात. अधिकृत निवेदन किंवा सरकारचे महत्त्वाचे संदेश चुकीच्या अनुवादामुळे गोंधळात टाकू शकतात. लोकांना हे समजत नाही की, ते मूळ संदेश नसून ऑटो ट्रान्सलेशनमधून आलेला चुकीचा मजकूर आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाने मेटाला पत्र पाठवून कन्नड ऑटो-ट्रान्सलेशन फिचर तात्पुरते बंद करण्याची मागणी केली होती. त्यावर आता मेटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कन्नड ट्रान्सलेशनमध्ये काही काळ गडबड झाली होती. आम्ही समस्येचे निराकरण केले आहे. आम्हाला याबद्दल खेद आहे.
सध्या मेटाने आपल्या कन्नड ट्रान्सलेशन फिचरमध्ये सुधारणा केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना अधिक जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याचा सल्ला दिला आहे.