डेहराडून- उत्तराखंडमधील भाजपाचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारवर टीका केल्याबद्दल गढवाली लोकगीत गायक पवन सेमवाल यांच्यावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या गीतातील एका ओळीने महिलांचा अपमान झाल्याची तक्रार एका नागिरिकाने केल्यानंतर त्यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेल्या आणीबाणीच्या काळाने सतत गळे काढणाऱ्या भाजपाच्याच राज्यात हा प्रकार घडला आहे. लोकगीतांचे गायक पवन सेमवाल यांनी राज्यातील परिस्थिती, वाढती बेरोजगारी, मद्यांच्या दुकांनामध्ये होत असलेली वाढ ही सध्याची उत्तराखंडची स्थिती दाखवून देणारे एक गीत प्रकाशित केले. त्यातील मद्यांच्या दुकांनांमधील वाढ व वाढत्या वेश्याव्यवसायांच्या विरोधात असलेल्या ओळींनी महिलांचा अपमान झाल्याचे म्हणत डेहराडूनच्या एका नागरिकाने तक्रार केली. त्यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सेलवाल यांच्या विरोधात समन्स जारी केला आहे. सेमवाल हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्यावर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गढवाली भाषेतील या गीताचे शिर्षक तिन भी नी थामी असे असून त्याचा अर्थ त्यांच्याकडून स्थिती सांभाळली जात नाही असा आहे. हे गीत युट्यूबर जारी करण्यात आले तेव्हा त्याला १५ हजारहून अधिक व्यक्तींनी पाहिलेले आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेले हे गीत तिथून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान सुमेवाल यांनी म्हटले आहे की, हे गाणे जरी सध्या युट्यूबवरुन काढून टाकण्यात आले असले तरी येत्या एक दोन दिवसात ते पुन्हा नव्या रुपात सादर केले जाईल. या नव्या गीताने अधिक तांडव निर्माण होईल.
