मुंबई- मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लोकलच्या डब्यात 11 जुलै 2006 रोजी 11 मिनिटांत एकामागोमाग एक 7 साखळी बॉम्बस्फोट (Serial Bombalst) झाले. यात 209 निष्पाप प्रवासी ठार झाले होते. 2015 साली यातील 5 दोषींना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले. आज उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या सर्वच्या सर्व 12 जणांना निर्दोष मुक्त केले.
यामुळे मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. रमेश नाईक यांची कन्या या स्फोटात ठार झाली. ते भावविवश होऊन म्हणाले की, या आरोपींनी स्फोट केला नाही तर कुणी केला याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आणखी काही पीडितांनी मंत्रालयात जाऊन हाच सवाल केला.
या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने 2015 साली 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले होते. एकूण 12 आरोपींपैकी कमल अन्सारी याचा कोरोनामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला. विशेष पीठाचे न्या. अनिल किलोर व श्याम चांडक यांनी आज उर्वरित 11 आरोपींना निर्दोष ठरवत मुक्त करण्याचे आदेश दिले.
मुंबईत 11 जुलै 2006 रोजी सायंकाळी 6.24 वाजल्यापासून झालेल्या 7 साखळी स्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 707 जण जखमी झाले होते. हे बॉम्ब प्रेशर कुकरमध्ये ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर मकोका कायद्याखाली सुनावणी झाली. ऑक्टोबर 2015 मध्ये विशेष सत्र न्यायालयाने फैजल शेख, असीफ खान, कमल अन्सारी, नाविद खान व एहतशाम सिद्दीकी या 5 आरोपींना फाशीची शिक्षा तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद मर्गुब अन्सारी, मुझ्झम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख व जमीर अहमद लतीफूर रहमान शेख या 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यातील कमल अन्सारी या फाशीची शिक्षा झालेल्या दोषीचे 2021 मध्ये नागपूरच्या कारागृहात कोरोनामुळे मृत्यू झाला. आरोपींनी आपल्या शिक्षेच्या विरोधात 2015 मध्येच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून ही सुनावणी प्रलंबित होती. 2022 मध्ये राज्य सरकारने सुनावणी घ्यावी असा अर्ज करीत पुराव्यांचे प्रमाण पाहता या खटल्याची सुनावणी 5 ते 6 महिन्यांत होईल असे म्हटले होते. मात्र काहीच झाले नाही. अखेर या खटल्याची सुनावणी तातडीने व्हावी यासाठी जुलै 2024 मध्ये विशेष पीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या खटल्याची दररोज सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयात युक्तीवाद करताना त्यांनी आरोपींच्या शिक्षेचे समर्थन दिले. ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याने विशेष न्यायालयाने फाशी व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवावी असे त्यांनी मांडले. आरोपींच्या वतीने एस मुरलीधर, युग मोहित चौधरी, नित्या रामकृष्णन व एस. नागमुथु यांनी बाजू मांडली. विशेष पीठाचे न्या. अनिल किलोर व श्याम चांडक यांनी आज दिलेल्या निकालात म्हटले की, फिर्यादी पक्षाला केवळ संशयाच्या पलीकडे जाऊन आरोपींवर गुन्हा सिद्ध करता आला नाही. साक्षीदारांच्या नोंदवलेल्या साक्षीत तथ्य वाटत नाही. रस्त्यावरील टॅक्सी ड्रायव्हर व लोकलमधील प्रवाशांना घटनेच्या 100 दिवसांनंतर आरोपींचे चेहरे लक्षात राहतील हे मान्य करता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणातील जप्त केलेले बॉम्ब, बंदुका, नकाशे हे सर्व पुरावे अप्रस्तुत वाटतात. कारण या स्फोटात कोणत्या प्रकारचे बॉम्ब वापरले गेले हे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अयशस्वी ठरला आहे. फक्त कबुलीजबाबावर हा निकाल दिल्याचे दिसते. या कबुलीजबाबात विसंगती आहे. कबुलीजबाब दबाव टाकून घेतला अशी तक्रार आहे.
असे घडले होते बॉम्बस्फोट
11 जुलै 2006 ची संध्याकाळ मुंबईसाठी सर्वसाधारण होती. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. मात्र संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी खार रोड व सांताक्रूझ दरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यात पहिला बॉम्बस्फोट झाला व परिस्थिती बदलली. त्यानंतर एकापाठोपाठ एक सहा स्फोट झाले. पहिल्या स्फोटाच्या वेळीच वांद्रे व खार रोड दरम्यान स्फोट झाला. पुढच्या मिनिटाला 6 वाजून 25 मिनिटांनी जोगेश्वरीच्या फलाट क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात स्फोट झाला. 6 वाजून 26 मिनिटांनी माहिम फलाट क्रमांक 3 वर, 6.29 मिनिटांनी मिरा रोड ते भाईंदर दरम्यान रेल्वेत तर साडेसहा वाजता माटुंगा रोड ते माहिम जंक्शन दरम्यान 6 वाजून 35 मिनिटांनी बोरीवलीत एका बॉम्बचा स्फोट झाला. या ठिकाणी पोलिसांना दुसराही बॉम्ब सापडला होता. मात्र त्यांनी तो निकामी केला. या स्फोटातील सर्व बॉम्ब हे प्रथम श्रेणीच्या डब्यात ठेवण्यात आले होते. ते कुकरमध्ये ठेवण्यात आले होते व त्या कुकरचा स्फोट झाला. हे स्फोट इतके शक्तिशाली होते की, रेल्वेचा शक्तिशाली पत्राही फाटला होता. त्या रात्री पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली. अनेक प्रवासी जागोजागी अडकून पडले होते. मुंबईच्या सर्वच रुग्णालयांमध्ये जखमींची रीघ लागली होती.
असा रचला कट
मार्च 2006 मध्ये लष्कर-ए-तैय्यबाचा सूत्रधार अजम चिमा याच्या हवेलीत हा कट शिजवण्यात आला. त्यासाठी 50 जणांना तयार करण्यात आले व त्यांना बहावलपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले. 25 जून 2006 रोजी नेपाळ,
बांगलादेश व कच्छच्या सीमेतून दहशतवाद्यांना मुंबईत आणण्यात आले. 8 ते 10 जून दरम्यान 15 ते 20 किलो आरडीएक्स कांडलामार्गे भारतात आणले गेले. मुंबईच्या सांताक्रूझमधून 8 कुकर खरेदी करण्यात आले. 9 ते 10 जुलै या दोन दिवसांमध्ये महम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये हे बॉम्ब बनवण्यात आले व नंतर ते 11 ठिकाणी पेरण्यात आले असे सांगितले गेले. मात्र नेमका बॉम्बस्फोट कुणी केला हे आजही कळलेले नाही. बॉम्बस्फोट झाल्यानंतर प्रथम पाकिस्तानच्या आयएसआयचा हात आहे असे म्हटले गेले, मग सिमी संघटनेवर आरोप झाला, त्यानंतर लष्कर- ए-तोएबावर संशय व्यक्त झाला.
