Jagdeep Dhankhar Resigns: जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

Jagdeep Dhankhar Resigns

Jagdeep Dhankhar Resigns: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar Resignation) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2022 पासून उपराष्ट्रपतीपदाची (Vice President Jagdeep Dhankhar ) जबाबदारी सांभाळणाऱ्या 74 वर्षीय धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभा अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळल्यानंतर ही घोषणा केली.

उपराष्ट्रपतींकडे राज्यसभा अध्यक्षपदाची देखील जबाबदारी असते. आता त्यांनी राजीनामा दिल्याने हे पद देखील रिक्त झाले.

आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले की, “आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ला पाळण्यासाठी मी घटनेच्या कलम 67 अ अंतर्गत तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.” हे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले. त्यानंतर उपराष्ट्रपती कार्यालयाकडून अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

राजीनाम्यानंतर कायदेशीर प्रक्रिया

संविधानाच्या कलम 67 नुसार, नवा उपराष्ट्रपती निवडला जाईपर्यंत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. उपराष्ट्रपती आपल्या कार्यकाळाच्या मुदतीपूर्वी राजीनामा देऊ शकतात, मात्र तो राजीनामा राष्ट्रपतींना लिहून द्यावा लागतो.

धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने देशाच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, नवीन उपराष्ट्रपतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

कार्यकाळात ठळक ठसा; पंतप्रधान, राष्ट्रपतींचे मानले आभार

धनखड यांनी आपल्या पत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानले. “माझ्या कार्यकाळात त्यांनी दिलेला पाठिंबा आणि सौहार्दपूर्ण संबंध माझ्यासाठी प्रेरणादायक ठरले,” असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या सहकार्यामुळे आपण बरेच काही शिकलो, असेही त्यांनी म्हटले.

याच वर्षी मार्चमध्ये त्यांना अस्वस्थ वाटल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही आठवड्यांपूर्वी उत्तराखंडमधील कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरताना त्यांना चक्कर आली होती.

राजीनाम्याच्या दिवशीच, उपराष्ट्रपती म्हणून काम पाहताना त्यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्याची मागणी करणाऱ्या पत्राचा उल्लेख केला. 50 हून अधिक राज्यसभा सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्राचा त्यांनी स्वीकार केला असून, पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश महासचिवांना दिले.

धनखड यांनी अलीकडेच न्यायव्यवस्थेवर तीव्र टीका करत म्हटले होते की, संसद सर्वोच्च असते. “आपल्याकडे असे न्यायाधीश आहेत जे कायदे बनवतात, कार्यकारी निर्णय घेतात आणि कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती.

धनखड – कार्यकाळ अपूर्ण ठेवणारे सातवे उपराष्ट्रपती

जगदीप धनखड हे भारताचे अशा प्रकारे राजीनामा देणारे सातवे उपराष्ट्रपती ठरले आहेत. त्यांनी उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाच पदाचा त्याग केला. 2022 मध्ये त्यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करत उपराष्ट्रपतीपद मिळवले होते. याआधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी अनेक वेळा वाद झाले होते.