Indore Ganesh Idol Controversy: मध्य प्रदेशातील इंदूर शहरात गणपतीच्या आक्षेपार्ह मूर्तींची निर्मिती केल्याचे आरोप करत काही शिल्पकारांना मारहाण करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका स्थानिक शिल्पकाराच्या कार्यशाळेत घुसून बंगाली कलाकारांवर गणरायाच्या मूर्ती “आक्षेपार्ह आणि आधुनिक” शैलीत बनवून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
एका गणेश मूर्तीमध्ये गणपती बाप्पा एका महिलेला हातात घेऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले होतेबजरंग दलाने या चित्राला ‘अपमानजनक’ मानले. या डिझाइनमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मूर्तीकारांच्या चेहऱ्याला काळे फासले आणि त्यांना खजराना पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
जरंग दलाच्या सदस्यांनी दावा केला की, याच कलाकारांच्या गटाने यापूर्वी बुरखा घातलेल्या देवीच्या मूर्ती बनवल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षीच्या पोलीस तपासात हा आरोप निराधार असल्याचे आढळून आले होते.
पोलिसांकडून कारवाई, अनेक कलाकार ‘अवैध’
पोलिसांनी या घटनेनंतर धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या परिसरातील मूर्ती बनवणाऱ्या 50 हून अधिक कामगारांच्या कागदपत्रांची आणि पोलीस पडताळणीच्या स्थितीची चौकशी सुरू केली आहे. अनेक कलाकारांनी अनिवार्य पोलीस पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मूर्तीकारांनी मागितली माफी
बजरंग दलाच्या रोषाला आणि वाढत्या दबावाला सामोरे जात, बंगाली कलाकारांनी हात जोडून सार्वजनिकरित्या नकळतपणे भावना दुखावल्याबद्दल माफी मागितली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.