मुंबई – महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar faction) गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui murder) यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने जामीन अर्ज नाकारला. याप्रकरणी न्या. महेश जाधव यांच्यासमोर आरोपी अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील महेश मुळे आणि सिद्दीकी यांचे वकील प्रदीप घरत आणि त्रिवनकुमार कर्णानी यांनी आक्षेप घेतला. सरकारी पक्ष आणि पीडित कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या आक्षेपांवरून न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कॉल डेटा रेकॉर्डच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली. या आरोपींविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू असतानाच अखिलेंद्रप्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. जामीन अर्जात अखिलेंद्रने मकोका लावण्याच्या पोलिसांच्या निर्णयालाच आव्हान दिले. तर आकाशदीप याने त्याला आरोपी करण्यासाठी पोलिसांकडे ठोस पुरावेच नाही असा दावा केला.