Rishabh Pant Injury: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025च्या (Ind vs Eng) उर्वरित कसोटींमध्ये भारतीय संघात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant Injury) दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला असून, त्याच्या जागी तामिळनाडूचा यष्टीरक्षक-फलंदाज एन. जगदीसनची (N Jagadeesan) निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना पंतच्या उजव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे तो सीरिजमधील शेवटचा सामना खेळणार नसल्याची शक्यता आहे.
ईशान किशन – जगदीसनचा पर्याय
बीसीसीआय, राष्ट्रीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांनी पंतच्या पर्यायाचा शोध सुरू केला होता. रिपोर्टनुसार, सुरुवातीस ईशान किशन याला पर्याय म्हणून पाहण्यात आले होते, परंतु तो उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 29 वर्षीय एन. जगदीसनकडे संघाचे लक्ष गेले.
संघ व्यवस्थापनाने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील अंतिम कसोटीत जगदीसनला सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते.
देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी
जगदीसनच्या निवडीमागे त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी कारणीभूत ठरली आहे. त्याने 52 प्रथम श्रेणी सामन्यांत 47.50 च्या सरासरीने 3373 धावा केल्या आहेत. यात 14 अर्धशतके आणि 10 शतकांचा समावेश आहे.
गेल्या रणजी हंगामात त्याने 8 सामन्यांत 56.16 च्या सरासरीने 674 धावा फटकावल्या होत्या. त्यात दोन शतके आणि पाच अर्धशतके होती. ही धावसंख्या तामिळनाडूच्या संघासाठी सर्वाधिक होती. यष्टीरक्षकांच्या यादीत तो विदर्भाच्या अक्षय वाडकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता.
संघ व्यवस्थापनाकडे के.एस. भरत हा आणखी एक पर्याय होता. तो सध्या इंग्लंडमध्ये डुलविच क्रिकेट क्लबकडून खेळत आहे. त्याने भारताकडून इंग्लंडमध्ये कसोटी सामनाही खेळला आहे. मात्र, तरीही त्याची निवड करण्यात आली नाही. सध्या चौथ्या कसोटीत ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करत आहे. भारताकडे के.एल. राहुलसारखा अनुभवी यष्टीरक्षक पर्यायही उपलब्ध आहे.