धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले…

Dhananjay Munde

Dhananjay Munde: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी मोठी टीका केली होती. मात्र, अलीकडे न्यायालयाने कृषी विभागातील अनियमितता प्रकरणात त्यांना निर्दोष जाहीर केल्याने त्यांच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत.

अजित पवारांचे संकेत : “क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपद मिळेल”

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, धनंजय मुंडेंना कृषी विभागाशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. आणखी एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यात ते निर्दोष आढळले तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली जाईल, असे ते म्हणाले.

कृषी विभाग घोटाळ्याचा निकाल : मुंडेंना मोठा दिलासा

धनंजय मुंडे यांच्या काळात कृषी विभागात 200 ते 245 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. शेतकऱ्यांना थेट वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या योजनांमध्ये गैरप्रकार झाल्याचा मुद्दा होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने 1सरकारच्या निर्णयाला वैध ठरवत विरोधी याचिका फेटाळल्या. त्यामुळे मुंडेंना या आरोपांमधून मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकाटेंच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह?

दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधिमंडळात रमी खेळल्याचा आरोप असून त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मंत्रिपदावरही टांगती तलवार आहे. यावर अजित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ.