PM Modi Maldives Visit: भारत मालदीवला देणार 4,850 कोटींचे कर्ज, मोदींच्या दौऱ्यात कोणते महत्त्वाचे करार झाले? जाणून घ्या 

PM Modi Maldives Visit

PM Modi Maldives Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Maldives Visit) यांनी मालदीवच्या (India-Maldives Relations) दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. माले येथील रिपब्लिक स्क्वेअरवर पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले.

या दौऱ्यात दोन्ही देशातील नेत्यांमध्ये विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये आर्थिक, पर्यावरणीय, औषध, गृहनिर्माण व संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार (India-Maldives Trade Agreement) झाले.

भारतीय रुपयांत मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज

भारताने मालदीवला 4,850 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. विशेष म्हणजे हे कर्ज प्रथमच भारतीय रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी स्पष्ट केले की, हे कर्ज मालदीवच्या पायाभूत विकासात मदतीचे ठरेल आणि स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात बदल घडवेल. याशिवाय, आधीच्या डॉलरमध्ये असलेल्या कर्जाच्या अटींमध्येही सुधारणा करण्याचा करार करण्यात आला.

मुक्त व्यापार करारावर चर्चा आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माले येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांदरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याची घोषणा केली. मुइज्जू म्हणाले, “मी भारत आणि मालदीव दरम्यान मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याची घोषणा करताना आनंदित आहे. हा महत्त्वाचा उपक्रम आमच्या आर्थिक भागीदारीला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

दोन्ही देशांमध्ये मत्स्यव्यवसाय, जलचर शेती, हवामानशास्त्र, पर्यटन आणि औषध मानक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी झाली. विशेषतः मालदीवने भारताच्या औषध मानक ग्रंथाला अधिकृत मान्यता दिली आहे.

पर्यटन, वाहने आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

भारताने मालदीवला 72 वाहने आणि 4,000 गृहनिर्माण युनिट्सपैकी उर्वरित 3,300 युनिट्सचे हस्तांतरण करून मोठा पाठिंबा दिला आहे. मालदीवच्या अध्यक्षांनी पर्यटन क्षेत्रातील सहकार्य, थेट विमानसेवा आणि ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पासारख्या योजना भारतासोबत आणखी बळकट करण्याचा मानस व्यक्त केला.

मोदींचे पारंपरिक स्वागत

पंतप्रधान मोदींचे स्वागत ‘हैयकोलहू’ या पारंपरिक सन्मानाने करण्यात आले. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सने पंतप्रधान मोदींना पारंपरिक ‘हैयकोलहू’ भेट दिले, जे मालदीवचे आदरातिथ्य आणि आदराचे प्रतीक आहे. यापूर्वी, MNDF द्वारे पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.