Akhil Patel: ‘एका चहावाल्याकडून दुसर्‍या चहावाल्याला…’ , लंडनमध्ये मोदींना चहा पाजणारा अखिल पटेल कोण आहे?

Who is Akhil Patel

Who is Akhil Patel: एकेकाळी डेटा विश्लेषक असलेला आणि आता पूर्णवेळ चहा उद्योजक बनलेला अखिल पटेल (Akhil Patel) सध्या भारतासह ब्रिटनमध्ये चर्चेत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. यावेळी अखिलने ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः बनवलेला मसाला चहा पाजला.

अखिलचा पंतप्रधान मोदींसोबतचा गप्पा मारतानाचा व चहा देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

पंतप्रधानांच्या बैठकीत ‘चाय पे चर्चा’

पंतप्रधान स्टार्मर यांच्या चेकरमधील अधिकृत निवासस्थानी अखिलने स्वतः बनवलेला चहा पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांना दिला.पंतप्रधान मोदींनी त्याचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत लिहिले, “केअर स्टार्मरसोबत चाय पे चर्चा, भारत-यूके संबंध अधिक मजबूत करत आहोत!”

कोण आहे अखिल पटेल?

अखिल पटेलने लंडनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर डेटा विश्लेषक म्हणून काम केले. मात्र 2018 मध्ये लडाखला गेलेल्या एका प्रवासाने त्याचे जीवन बदलले. या प्रवासात त्याने चहा हे फक्त पेय नसून एक अनुभव, एक भावना आहे हे अनुभवले. त्यातूनच ‘अमाला चाय’ या ब्रँडचा जन्म झाला.

2019 मध्ये आजीच्या पारंपरिक पाककृतीवर आधारित मसाला चहा घेऊन त्याने ‘अमाला चाय’ची सुरुवात केली. आसाम आणि केरळमधील शेतकऱ्यांकडून थेट चहा आणि मसाले घेतले जातात. त्यासाठी पटेलने भारतात प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांशी संपर्क साधला. पुरवठा साखळीतील मध्यस्थ टाळून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे, सेंद्रिय पद्धतींना प्राधान्य देणे हे त्याचे धोरण आहे.

मे महिन्यात अखिल आणि त्याची 96 वर्षीय आजी ब्रिटिश म्युझियमच्या सोशल मीडियावर झळकले होते. आजी 50 वर्षांपूर्वी चांगल्या संधींसाठी ब्रिटनमध्ये आल्या होत्या. अखिलने सहा वर्षांपूर्वी लंडनमध्ये व्यवसाय सुरू केला आणि आता ‘अमाला चाय’ पाच ठिकाणी विकला जातो.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या ब्रिटन दौऱ्यात अखीलला पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर यांना स्वतःचा मसाला चहा पाजण्याची संधी मिळाली. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तो म्हणतो, “मी ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरात चहा देत होतो. आणि एकालाही कॉफी नको होती.”

तो पुढे लिहतो, “एका ‘चायवाला’कडून दुसऱ्या ‘चायवाला’ला, तो एक खास दिवस होता. ठीक आहे… मी आता इंटरनेट बंद करून एक कप चहा बनवायला जातोय.”, त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.