UK Indian Movie Viral Video: भारतात एखाद्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रीचा चित्रपट आला की थिएटरमध्ये जाऊन गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी नाही. चित्रपटातील गाण्यावर थिएटरमध्येच नाचणे, तिकिट उडवणे हे एकप्रकारे सर्वसामान्य झाले आहे. मात्र, ब्रिटनमध्ये एका भारतीय चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान असे करणे प्रेक्षकांना चांगलेच महागात पडले.
ब्रिटनमधील एका चित्रपटगृहात तेलुगू चित्रपट ‘हरी हरा वीरा मल्लू’ च्या प्रदर्शनादरम्यान कर्मचाऱ्यांनी चित्रपटाचा शो मध्येच थांबवल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहात कागदी तुकडे फेकले आणि मोठ्या प्रमाणात कचरा केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
नेमकं काय घडलं?
‘@MeruBhaiya’ नावाच्या यूजरने ‘एक्स’ (ट्विटर) वर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “यूकेमध्ये ‘हरी हरा वीरा मल्लू’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान काही लोकांनी कागदी तुकडे फेकले आणि शोमध्ये व्यत्यय आणला.” त्यांनी पुढे म्हटले आहे की, “यावेळी कर्मचाऱ्यांनी चित्रपट थांबवला आणि प्रेक्षकांना जाब विचारला. अशा प्रकारचा ‘हुल्लडपणा’ अस्वीकार्य आहे आणि त्याचा तीव्र निषेध व्हायला हवा.”
A group of people threw confetti during a screening of Hari Hara Veera Mallu in the UK, disrupting the show. The staff rightly stopped the film and called them out. This kind of hooliganism is unacceptable and deserves strong condemnation. pic.twitter.com/hPfXuPlLXj
— Meru (@MeruBhaiya) July 24, 2025
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
या व्हिडिओला जवळपास 30 लाख वेळा पाहिले गेले असून, शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. बहुसंख्य लोकांनी चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. काही जणांनी म्हटले आहे की, गोंधळ करणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटगृह स्वच्छ करण्याची तयारी दर्शवायला हवी होती.
एका यूजरने म्हटले, “दुर्दैवी आहे, पण ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना खरोखरच शिस्तीचे धडे घेण्याची गरज आहे… सर्वत्र अत्यंत वाईट वागणूक.” तर दुसऱ्याने विचारले, “त्यांना बाहेर का काढले नाही?!” आणखी एका यूजरने लिहिले की, “त्यांनी किमान माफी मागून स्वच्छता करण्याची तयारी दर्शवायला हवी होती. युक्तिवाद करण्यापेक्षा ते अधिक सभ्य ठरले असते.”
एका यूजरने असे म्हटले की, लोकप्रिय चित्रपटांदरम्यान कागद आणि इतर वस्तू फेकणे ही दक्षिण भारतातील भारतीयांची एक सांस्कृतिक बाब आहे. “
ते दक्षिण भारताचे असोत किंवा उत्तर भारताचे, ब्रिटनमध्ये अशा प्रकारची वागणूक पूर्णपणे अस्वीकार्य आहे. भारतीय चित्रपटगृहांमध्ये जे सामान्य मानले जाते, ते येथे कचरा करणे आणि अनादर करणे मानले जाते,” असे मूळ पोस्ट करणाऱ्याने स्पष्ट केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.