आशिया कप 2025 च्या तारखा जाहीर, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच मैदानावर एकमेकांना भिडणार

Asia Cup 2025 Schedule

Asia Cup 2025 Schedule: अखेर आशिया कपची (Asia Cup 2025 Schedule) घोषणा झाली आहे. यूएईमध्ये (Asia Cup Scheducle) सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी याबाबत घोषणा केली.

मोहसिन नक्की यांनी जाहीर केले की, 2025 मधील आशिया चषक स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या नक्वी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारत-पाकिस्तान (Asia Cup India Pakistan Match) संघ एकमेकांशी भिडणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच मैदानावर आमने सामने येतील.

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकाच गटात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे एक गट टप्प्यात, एक सुपर फोरमध्ये आणि अंतिम फेरीत दोन्ही संघ पोहोचल्यास तिसरा सामना अशा प्रकारे तीन लढती होऊ शकतात.

स्पर्धा टी-20 स्वरूपात होणार असून, ती 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी एक प्रकारची तयारी ठरेल. भारत आणि श्रीलंका संयुक्तरीत्या हा आगामी विश्वचषक आयोजित करणार आहेत.

एकूण आठ संघ सहभागी

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, यूएई, हाँगकाँग आणि ओमान असे एकूण आठ संघ सहभागी होतील. एकूण 19 सामने खेळवले जातील.

भारत यजमान, वेळापत्रक अंतिम करण्यात येणार

स्पर्धेचे अधिकृत यजमानपद भारताकडे असून, अंतिम वेळापत्रक ठरवण्याची जबाबदारीही भारताकडेच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या या मसुद्यावर काम करत असून, काही व्यावसायिक बाबींवर चर्चा सुरू आहे.

या स्पर्धेतील प्रमुख उत्पन्न भारतातूनच मिळते. 2024 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने आठ वर्षांसाठी या स्पर्धेचे प्रसारण हक्क 170 दशलक्ष डॉलर्सना घेतले आहेत. विशेषतः भारत-पाकिस्तान सामने अधिक प्रेक्षक खेचू शकतात, अशी अपेक्षा आहे.