आयटीचे वाटोळे! उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले! अजित पवार भडकले ! हिंजवडीच्या सरपंचांवर बरसले

पुणे – उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज हिंजवडीच्या आयटी पार्क पाहणी दौरा केला. पहिल्याच पावसाने हिंजवडीचे जलमय झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी दिलेल्या सूचनांचे कितपत पालन झाले आहे, हे तपासण्यासाठी ते इथे आले होते. मात्र, कामात हलगर्जीपणा आढळल्याने ते आक्रमक झाले. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांना सुनावले की, आपले वाटोळे झाले आहे. हिंजवडीचे आयटी पार्क पुण्यातून, महाराष्ट्रातून बाहेर बंगळुरू, हैदराबादला चालले आहे. तुम्हाला त्याचे काही पडलेले नाही. मी कशाला सकाळी सहा वाजता इथे आलो आहे? काम केल्याशिवाय आता गत्यंतर नाही.

यंदाच्या पहिल्याच पावसात हिंजवडी पुरते पाण्याखाली गेल्याने स्थानिकांसह इथल्या आयटी कंपन्यांतील नोकरदारांचे हाल झाले. त्यानंतर प्रशासन आणि सरकारविरोधात नाराजीची लाट पसरली होती. तिची दखल घेऊन अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी हिंजवडीत येऊन प्रशासनाला काही सूचना दिल्या होत्या. आज पुन्हा येऊन त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यांचा हा पाहणी दौरा सकाळी ६ वाजता हिंजवडीच्या क्रोमा चौकातून सुरू झाला. दौऱ्यादरम्यान रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली कामे पाहून त्यांचा पारा चढला. यादरम्यान, सरपंच जांभुळकर तिथले एक मंदिर पाडू नका, असा आग्रह करत होते. यावेळी अजित पवारांनी त्यांना खडसावले की, धरण बांधताना मंदिरे जातातच की नाही? तुम्हाला जे सांगायचे आहे ते सांगा, मी ऐकून घेतो आणि मग मला जे करायचे आहे, ते मी करेन.

ते पुढे म्हणाले की, हिंजवडीतील पहिल्या पावसामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतली. त्यानंतर मी हिंजवडीत काम करायचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी या परिसराची पाहणी करण्याचे मी ठरवले आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. अडचणी सोडवण्यात येणार आहेत. यासाठी काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. पण कोणालाही नाराज करायचे नाही. हिंजवडी परिसरातील वाहतुकीचे दुखणे कायमचे दूर करायचे असल्याने रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. पूर्वी दिलेल्या आदेशानुसार काही बांधकामे पाडावी लागली आहेत. हिंजवडी, माणच्या विकासात कुणी आडवा येत असेल, तर त्याच्या विरोधात ३५३ दाखल करा. कुणाचाही विचार करू नका. मी जर आडवा आलो, तर माझ्यावरही ३५३ दाखल करा. त्याशिवाय हिंजवडीतील प्रश्न सुटणार नाहीत.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते ? महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार आहे. पुणे शहराची वाट लावणार्या पालकमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यायला हवा.

तर आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारनेच महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याचे मान्य केले आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलेच. आपले वाटोळ झाले आहे, हे अजित दादा यांनीच मान्य केले हे उत्तम. महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणला यासाठी त्यांचे आभार.

Share:

More Posts