पाटणा- बिहारमधील मतदार याद्या (Bihar Voter lists) पुनरिक्षण ९१.६९ टक्के यशस्वी झाल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. बिहारमधील एकूण ७.८९ कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी (Voters) ७.२४ कोटी मतदारांनी पुनरिक्षणाची प्रक्रिया पूर्ण केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या मतदार याद्या पुनरिक्षणावर अनेक विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) पार्श्वभूमीवर राज्यात २४ जून ते २५ जुलै या काळात मतदारयाद्यांचे पुनरिक्षण केले गेले. यासाठी मतदारकेंद्र निहाय ७७, ८९५ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम केले. आयोगाने म्हटले की, याकामात राजकीय पक्षांनीही मोठे सहकार्य केले. पक्षांनी नियुक्त केलेल्या बुथ स्तरावरील प्रतिनिधींच्या संख्येतही १६ टक्के वाढ नोंदवली गेली. काँग्रेसने सर्वाधिक प्रतिनिधींची नियुक्ती केली. बिहारमधून कामानिमित्त दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी राष्ट्रीय स्तरावर जाहिराती देऊन जनजागृती करण्यात आली. या दरम्यान २९ लाख लोकांशी डिजीटल माध्यमातून संपर्क साधण्यात आला. १६ लाख अर्ज ऑनलाईन तर १३ लाख प्रत्यक्ष हस्तांतरीत करण्यात आले. शहरी भागातील मतदारांच्या सेवेसाठी २६१ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५६८३ विभागांमध्ये विशेष शिबीरे भरवण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने (Election Commission) येत्या १ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना फॉर्म ६ अन्वये अर्ज करण्याचे आवाहनही केले आहे. काहींनी या पुरिक्षण कामावर केलेल्या टीकेचाही आयोगाने समाचार घेतला आहे. या नव्या मतदार याद्या येत्या १ ऑगस्ट रोजी छापील व डिजीटल स्वरुपात प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यानंतरच विरोधी पक्षांचा आक्षेप किती खरा आहे हे लक्षात येईल. मतदार व राजकीय पक्ष येत्या १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात आपल्या हरकती नोंदवू शकतात. कोणालाही पूर्वसूचना दिल्याशिवाय त्याचे नाव मतदार यादीतून वगळले नसल्याचे आयोगाने दिले आहे.