पुणे – पुण्यातील खराडी भागातील रेव्ह पार्टी (Pune Rave Party) प्रकरणात अटकेत असलेले शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्याबाबत ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणीचा अहवाल (Medical report) आला आहे. या अहवालात प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) आणि श्रीपाद यादव (Shripad Yadav) या दोघांनी मद्यप्राशन (Alcohol) केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. आता ड्रगचे (Drug) सेवन व पुढील तपासासाठी आरोपींचे रक्त व लघवी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल चार ते सहा दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. या अहवालावरून आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, हे स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणावरून आज पत्नी रोहिणी खडसे यांनी खेवलकर यांच्यासोबत फोटो पोस्ट करत २४ तासांनंतर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असते. योग्यवेळी सत्य बाहेर येईल, असे त्यांनी म्हटले आणि ससून रुग्णालयाचा अहवाल पोलिसांनी देण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. त्या एक्स पोस्ट करत म्हणाल्या की, डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल ससून रुग्णालयाकडून प्राप्त झाला आहे अशा बातम्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जात आहेत. कुटुंब म्हणून आम्हाला तो अहवाल अजून प्राप्त झाला नाही , पण माध्यम प्रतिनिधींना तो अहवाल मिळाला आहे. आम्हाला तो अहवाल मिळावा यासाठी आम्ही पोलिसांकडे मागणी केली तर अहवाल थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे. असे सांगितले जात आहे. सध्या तो अहवाल माध्यम प्रतिनिधींना मिळाला आहे असे आम्ही वृत्तवाहिनींमध्ये पाहत आहोत. माझी माध्यम प्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की आपल्याला मिळालेला अहवाल आम्हाला द्यावा. जेणेकरून आम्हाला आमची बाजू मांडण्यास अहवाल उपयोगी ठरेल. या पार्श्वभूमीवर, रोहिणी खडसे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या ठरलेल्या वेळेत पोहोचू न शकल्यामुळे आयुक्तांनी ही भेट रद्द केली. दरम्यान, या प्रकरणातील निखील पोपटानी आणि श्रीपाद यादव यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
या अहवालाबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात मी बोलणे योग्य नाही. मात्र पोलिस यंत्रणेकडून माहिती कशी दिली जाते? एखाद्याच्या मोबाईल मधील व्हिडिओ बाहेर कसे येत आहेत? पोलिसांना काय अधिकार आहे? मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्परतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे? ससून मध्ये पोर्श कार प्रकरणात देखील रिपोर्ट मध्ये फेरफार झाला होता. त्यामुळे यावर शंका उपस्थित होते.
या प्रकरणी हॅकर मनीष भंगाळे म्हणाले की, खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना कॉल करून त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते. त्यानंतर या घटनास्थळी छापेमारी करण्यात आली.