अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आज सकाळी ८ च्या सुमारास आत्महत्या केली. त्यांनी राहत्या घरातील छताला दोर बांधून गळफास घेत आपले जीवन संपवले. ते सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. ते आमदार शंकरराव गडाख यांचे समर्थक देखील होते.
नितीन यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी त्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु होती. गेल्या काही महिन्यात शनि शिंगणापूर देवस्थानात अनेक घडामोडी झाल्या. याच पार्श्वभूमीवर नितीन यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरली आहे. आज सकाळी नितीन यांनी आत्महत्या केल्याचे उघड होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नितीन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.