जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची पाहणी

manoj jarange patil

मुंबई – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून मुंबईत मोर्चा येणार आहे. त्यांनी पुढचे उपोषण मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिष्टमंडळाने आज आझाद मैदानाची पाहणी केली. १५ ते २० वाहनांच्या ताफ्यासह शिष्टमंडळ मैदानात दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सविस्तर माहिती जरांगे पाटील यांना देणार असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळाने आझाद मैदानासह वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिवाजी पार्क या मैदानांचीही पाहणी केली. अंतिम निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार असून ते आंदोलनाच्या स्वरूपाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

जालना येथे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला. ते म्हणाले की, जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षण आणि मागण्या सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचे २९ ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन मुंबईतून मागे फिरणार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या वाट्याला जाऊ नका. आता अभ्यास वगैरे झाले. आता आमच्या मागण्यांची थेट सरकारकडून अंमलबजावणी झाली पाहिजे.